अहिल्यानगर : ऊस पिकातील हुमणी अळी नियंत्रणासाठी भोरे लोणीत कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांसाठी ‘शेती शाळा’चे आयोजन

अहिल्यानगर : लोणी बुद्रुक येथील अर्जुन लक्ष्मण विखे यांच्या वस्तीवर कृषी विभागाच्या वतीने क्रॉप सॅप अंतर्गत ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ‘शेती शाळा’ भरवली होती. यावेळी शेतीशाळेला कृषी विज्ञान केंद्र बाभळेश्वर येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. शैलेश देशमुख, तालुका कृषी अधिकारी आबासाहेब भोरे, लोणी मंडल कृषी अधिकारी रमेश चोपडे, उप कृषी अधिकारी वैशाली अडसुरे, सहाय्यक कृषी अधिकारी संध्या महागडे, कृत्तिका शहाणे तसेच प्रगतशील शेतकरी नाना म्हस्के आदी उपस्थित होते. यावेळी बियाणे उगवण क्षमता तपासणीबाबत डेमो घेण्यात आला. हुमणी अळी नियंत्रण सापळ्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.

यावेळी राहाता येथील तालुका कृषी अधिकारी आबासाहेब भोरे म्हणाले की, ऊस शेतीवर हुमणी अळीचे मोठे संकट आहे. ते आता इतर पिकांवरही येऊ लागले आहे. औषधे हा त्यावरील प्रभावी उपाय नसून अळीचे एकात्मिक नियंत्रण हा एकच पर्याय आहे. हुमणी अळीमुळे ऊस पिकाच्या मुळांवर परिणाम होऊन उत्पादनात मोठी घट येते. त्यामुळे शेतकऱ्यांनी व्यवस्थापनावर भर द्यावा. तर वरिष्ठ शास्रज्ञ डॉ. शैलेश देशमुख यांनी जमिनीची मशागत, लागवड, खत, पाणी आणि किड नियंत्रण व्यवस्थापन या पंचसूत्रीचा शेतकऱ्यांनी वापर करावा असे सांगितले. यंदा एल-निनोच्या प्रभावामुळे यंदा काळजीपूर्वक पीक नियोजन करावे, असे आवाहन कृषी विभागाने केले. दादासाहेब म्हस्के यांनी स्वागत केले. तर संध्या महागडे यांनी प्रास्ताविक केले.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here