अहिल्यानगर : यंदाचा, गाळप हंगाम २०२६-२७ सुरू करण्याच्या दृष्टीने करावयाची संबंधित कामे १५ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होऊन अंबालिका शुगर गाळपासाठी सज्ज होईल. कारखाना व्यवस्थापनाने अनेक आव्हानांना तोंड देत अंबालिका शुगर कारखाना चांगल्या पद्धतीने चालविला आहे. ऊस उत्पादक शेतकरी, तोडणी-वाटप कंत्राटदार, मजूर, कारखाना कामगार, तसेच कारखान्यावर अवलंबून असणाऱ्या सर्व घटकांना न्याय दिला आहे. यंदाच्या गाळप हंगामात १८ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे, अशी माहिती अंबालिका शुगरचे मुख्य संचालन अधिकारी जंगल वाघ व कार्यकारी संचालक के. एस. चौगुले यांनी दिली.
येत्या गळीत हंगामात कारखाना कमी कालावधीत विना अडथळा चालविण्यासाठीची पूर्वतयारी अंतिम टप्प्यात आल्याची माहिती वाघ यांनी दिली. ते म्हणाले की, २०११ पासून अंबालिकाने गाळप केलेल्या ऊसाला दरवर्षी एफआरपीपेक्षा अधिक दर देऊन जादा ऊसदर देण्याची परंपरा कायम ठेवली आहे. तीच परंपरा चालू वर्षीच्या गाळपासाठीही लागू राहील. अंबालिकाची जी विश्वासार्हता निर्माण झाली आहे, त्या विश्वासार्हतेला तडा जाऊ दिला जाणार नाही. कारखान्याबाबत सध्या काही अफवा पसरविल्या जात आहेत. त्या अफवांवर विश्वास न ठेवता, कारखाना व्यवस्थापनावर विश्वास ठेवून चालू गाळप हंगामात १८ लाख टन ऊसाचे गाळप करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन वाघ व चौगुले यांनी केले.


















