अहिल्यानगर : काही कारखान्यांना स्वतःच्या वित्तीय संस्था, बँका किंवा विविध उपउत्पादनांमधून आर्थिक आधार मिळतो. मात्र, केदारेश्वर कारखान्याकडे कोणतेही मोठे बायप्रॉडक्ट नाही किंवा स्वतःची बँकही नाही. तरीदेखील व्यवस्थापनाने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कारखाना सक्षमपणे चालविला आहे. कारखान्याने आजपर्यंत कोणत्याही शेतकऱ्याचे पैसे बुडविलेले नाहीत. थकीत रक्कम नसून केवळ देयक अदा होण्यास विलंब झाला आहे. हा विलंब झाल्याचे आम्ही मान्य करतो. मात्र, प्रत्येक शेतकऱ्याचा एक-एक रुपया दिला जाईल, याची हमी व्यवस्थापन देते, असे प्रतिपादन संघर्षयोद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर कारखान्याचे अध्यक्ष ऋषिकेश ढाकणे यांनी केले.
गळीत हंगाम २०२५-२६ मधील थकीत एफआरपीच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध केलेल्या निवेदनात ढाकणे यांनी म्हटले आहे की, चालू गाळप हंगामातील उर्वरित ऊसबिलाची रक्कम शेतकऱ्यांना कुठल्याही परिस्थितीत मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी विचलित होण्याचे कारण नाही. या विषयाचे कोणीही राजकीय भांडवल करू नये. राज्यातील साखर उद्योग सध्या आर्थिक अडचणींना सामोरे जात आहे. साखरेच्या बाजारभावात अपेक्षित वाढ झाली नसल्याने अनेक कारखान्यांवर आर्थिक ताण निर्माण झाला आहे. सध्या बँकेची प्रक्रिया सुरू असून, त्यातून निधी उपलब्ध झाल्यानंतर येत्या काही दिवसांत सर्व शेतकऱ्यांची थकीत रक्कम अदा करण्यात येणार आहे. उसाचे पैसे देण्यास अपेक्षेपेक्षा अधिक विलंब झाला हे मान्य असले, तरी कोणाच्याही पैशांवर गदा येणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गेल्या दोन वर्षांपासून कारखाना आर्थिक तुटीमुळे अडचणींत आला असला, तरी गेल्या वर्षी एकही रुपया ठेवला नाही. यावर्षीही ठेवणार नाही, असे ते म्हणाले.


















