अहिल्यानगर : अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या ३३ व्या गळीत हंगामाचा प्रारंभ

अहिल्यानगर : शेतकरी आणि कामगारांनी एकजुटीने व विश्वासाने काम करून अडचणींवर मात केली, तर सहकारी साखर कारखानदारीला पुन्हा चांगले दिवस येऊ शकतात. अगस्ती सहकारी साखर कारखान्याचा यंदाचा गळीत हंगाम सुरू झाला असून, अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपला ऊस अगस्ती कारखान्यालाच पुरवावा. ऊस बाहेरील कारखान्यांना पाठवू नये, असे आवाहन आमदार डॉ. किरण लहामटे यांनी केले. विजयादशमीच्या मुहूर्तावर अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या ३३ व्या गळीत हंगामाचा प्रारंभ आमदार डॉ. किरण लहामटे आणि खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. कारखान्याचे अध्यक्ष सीताराम पाटील गायकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

कारखाना सुरू राहणे तालुक्याच्या अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचे

ChiniMandi WhatsApp Channel

आमदार लहामटे म्हणाले की, अगस्ती सहकारी साखर कारखाना हा अकोले तालुक्यातील शेतकरी, ऊस उत्पादक आणि कामगारांच्या आर्थिक जीवनाशी जोडलेला महत्त्वाचा उद्योग आहे. कारखाना नियमित सुरू राहणे आणि गळीत हंगाम सुरळीत पार पडणे, हे संपूर्ण तालुक्याच्या अर्थव्यवस्थेसाठी आवश्यक आहे.कारखान्याला आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या माध्यमातून तसेच राज्य शासनाकडून निधी उपलब्ध करून घेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी काळात उसाची उपलब्धता काही प्रमाणात कमी झाली, तरी त्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. तालुक्यातील ऊस बाहेरील कारखान्यांकडे जाऊ देऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले.

ऊस उत्पादक आणि कामगारांच्या प्रश्नांवर चर्चा

गतवर्षी दिवाळीपूर्वी गाळप झालेल्या उसासाठी प्रतिटन २०० रुपये देण्याचा मुद्दा तसेच कामगारांना दोन पगार देण्याचा विषय यावेळी उपस्थित करण्यात आला. यंदाचा गळीत हंगाम सुमारे ५० दिवस चालेल की नाही, याबाबत कामगारांमध्ये चिंता असल्याचेही सांगण्यात आले.कारखान्याचा गळीत हंगाम पूर्ण क्षमतेने आणि यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी शेतकरी, कामगार आणि संचालक मंडळाने परस्पर सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.

कारखान्याला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सहकार्याची गरज

केंद्र सरकारकडून निधी मिळविताना कारखान्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे आमदार लहामटे यांनी नमूद केले. कारखान्याचे अध्यक्ष सीताराम पाटील गायकर यांनीही मागील वर्षी कारखाना चालविताना अनेक अडचणी आल्याचे सांगितले.अगस्ती कारखान्याला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सर्व घटकांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. यंदाचा गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी शेतकरी, कामगार आणि संचालकांनी एकजुटीने प्रयत्न करावेत, असे आवाहन गायकर यांनी केले. या कार्यक्रमाला जालिंदर भोर, शिवसेनेचे बाळासाहेब भोर, अगस्ती पतसंस्थेचे अध्यक्ष अशोक देशमुख, विधिज्ञ वसंत मनकर, नगराध्यक्ष सोनाली नाईकवाडी, प्रकाश मालुंजकर, कैलास वाकचौरे, परबत नाईकवाडी, विकास शेटे, जगन देशमुख, अशोक आरोटे, कारखान्याचे कार्यकारी संचालक सुधीर कापडणीस यांच्यासह कारखान्याचे पदाधिकारी, संचालक, शेतकरी आणि कामगार उपस्थित होते.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here