अहिल्यानगर : आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक ऊस उत्पादक देश साखरेऐवजी इथेनॉल निर्मितीकडे वळले आहेत. त्यामुळे काही प्रमाणामध्ये साखर निर्यातीला संधी उपलब्ध झाली आहे. या संधीचा लाभ उठवत देशातील साखर उद्योगाला संजीवनी देण्याची आवश्यकता होती. याउलट केंद्र सरकारने याउलट निर्यात बंदी लादून शेतकऱ्यांना आणखी अडचणीत आणले आहे. हा साखर निर्यात बंदीचा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी माकप किसान सभेने केली आहे. केंद्र सरकारने साखर उद्योगाला वाचवण्यासाठी तातडीने निर्यात बंदी उठवावी. साखर निर्यातीला प्रोत्साहन द्यावे. साखर विक्री दरात वाढ करावी. आंतरराष्ट्रीय इंधन संकट पाहता इथेनॉल निर्मितीला मोठ्या प्रमाणात चालना द्यावी, अशी मागणी केली आहे.
किसान सभेच्यावतीने डॉ. अशोक ढवळे, जे. पी. गावित, डॉ. अजित नवले, उमेश देशमख यांनी सांगितले की, केंद्र सरकारने साखरेच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा घेतलेला निर्णय साखर उद्योगावर अत्यंत प्रतिकूल परिणाम करणारा आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी संकटात जातील. केंद्राने गेली अनेक वर्षे साखरेचे किमान विक्री मूल्य न वाढवल्यामुळे अगोदरच साखर उद्योग संकटात सापडला आहे. कारखान्यांना शेतकऱ्यांचे एफआरपीचे पैसेसुद्धा देता येणार नाहीत, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. केंद्राने साखर निर्यातीच्या इतर आणखी शक्यता शोधत निर्यात केंद्री धोरणाची अंमलबजावणी करावी व भारतीय शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.


















