अहिल्यानगर : कारेगाव (ता. श्रीरामपूर) येथे तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बैठक झाली. यावेळी पद्मश्री विखे-पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे-पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते. शेतकऱ्यांना ज्या कारखान्याला ऊस दिल्यानंतर पेमेंटची सुरक्षितता आणि हमी वाटते, त्याच कारखान्याला ऊस द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. मागील दोन वर्षांत शेतकऱ्यांनी विखे-पाटील कारखान्याला ऊस दिला असून, त्यांना चांगला दर देण्यात आला. यंदाही विक्रमी ऊस मिळण्याच्या दृष्टीने नियोजन सुरू आहे. ऊसतोडीत कोणत्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप सहन केला जाणार नाही, असे अध्यक्ष डॉ. सुजय विखे-पाटील यांनी स्पष्ट केले.
अध्यक्ष विखे-पाटील म्हणाले की, ऊस तोडणीच्या नियोजनात पारदर्शकता आणण्यासाठी यंदाच्या गाळप हंगामापासून ऊसतोडणीपूर्वी शेतातच उसाची रिकव्हरी तपासली जाणार आहे. रिकव्हरीच्या आधारे ऊसतोडणीला प्राधान्य देण्याचे नवे धोरण आमच्या साखर कारखान्याने स्वीकारले आहे. साखर कारखानदारी अडचणींतून जात आहे. कारखान्यांपुढे अनेक प्रश्न आहेत. जमाखर्चाचा ताळमेळ बसविण्यासाठी नवे प्रयोग करावे लागतील. त्यामुळे यंदा रिकव्हरी तपासून ऊसतोडणीला प्राधान्य दिले जाईल. कारखान्याला ऊस देणाऱ्या शेतकऱ्यांना ऊस लागवड प्रमाणपत्र दिले जाईल. कोणत्याही सेवा संस्थेने पीककर्ज देण्यास टाळाटाळ केल्यास त्याची दखल घेतली जाईल. मागील हंगामातील त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल. प्रवरा कारखान्याला ऊस देणाऱ्या गावांतील पाण्यासह अन्य प्रश्न सोडविण्याची जबाबदारी घेऊ, असेही त्यांनी सांगितले.


















