अहिल्यानगर : उसाला प्रतिटन पाच हजार रुपये दरासाठी नगर-मनमाड महामार्गावर शेतकऱ्यांचे आंदोलन

अहिल्यानगर : गुहा (ता. राहुरी) येथे नगर-मनमाड राष्ट्रीय महामार्गावर शेतकऱ्यांनी उसाची वाहने रोखली. उसाला प्रतिटन पाच हजार रुपये दर द्यावा, शेतकऱ्यांना प्रतिटन ५०० रुपये अनुदान द्यावे, इथेनॉलचा दर प्रतिलिटर ७० रुपये निश्चित करावा, अशा प्रमुख मागण्या आंदोलकांनी केल्या. शिवसेना शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी नेते प्रकाश देठे, दिलीप इंगळे, सतीश पवार आदींसह शेतकऱ्यांनी आंदोलनात भाग घेतला. शेतकऱ्यांच्या या आक्रमक आंदोलनामुळे सहा तास ऊस वाहतूक ठप्प झाली. शिर्डीच्या दिशेने रस्त्याच्या कडेला अडीच किलोमीटरपर्यंत उसाच्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

शेतकऱ्यांच्या या आंदोलनामुळे प्रवरा, संगमनेर, संजीवनी, कोळपेवाडी आदी साखर कारखान्यांची उसाची वाहतूक ठप्प झाली. तहसीलदार डॉ. अमित पवार व पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी आंदोलकांची समजून काढण्याचा प्रयत्न केला. उसाच्या वजनातील काटामारी रोखण्यासाठी वजनकाटे पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने चालवावेत. साखरेचा दर व्यवसाय व उद्योगांसाठी वेगळा आणि घरगुती वापरासाठी वेगळा ठेवावा, अशा मागण्याही शेतकऱ्यांनी यावेळी केल्या. आंदोलकांच्या मागण्या केंद्र व राज्य सरकारपर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन तहसीलदारांनी दिले. माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मध्यस्थीने आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here