अहिल्यानगर : आव्हाणे खुर्द, शहापूर परिसरातील आत्माराम आहेर यांच्या शेतातील ट्रान्सफार्मरमध्ये मंगळवार (ता. २७) सायंकाळच्या सुमारास शॉर्टसर्किट झाल्याने आग लागली. शेजारीच उसाचे क्षेत्र असल्याने व वेगाने वारा वाहत असल्याने आगीने अवघ्या काही वेळातच सुमारे दीड किलोमीटर परिसर व्यापला. आगीच्या रौद्ररुपामुळे शेतकऱ्यांना आग लवकर आटोक्यात येईना. या प्रयत्नात पाच ते सहा शेतकरी होरपळून जखमी झाले आहेत. शहापूर आणि चितळी परिसरात विजेच्या शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत तोडणीला आलेला सुमारे १०० ते १५० एकर क्षेत्रावरील ऊस जळून खाक झाला. या घटनेत दोन गावांतील पन्नासपेक्षा अधिक शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीत होरपळत असलेल्या शेतकऱ्यांवर अनपेक्षित लागलेल्या आगीने दुहेरी संकट ओढवले आहे. आगीत पाथर्डी तालुक्यातील चितळी येथील ऊस पिकांचे देखील नुकसान झाले.
आगीची माहिती मिळताच घटनास्थळी आलेल्या ज्ञानेश्वर व वृद्धेश्वर कारखान्याच्या अग्निशामक दलासही आग आटोक्यात आणण्यात लवकर यश आले नाही. रात्री उशिरा परिसरातील पूर्ण ऊस जळून खाक झाल्यानंतर आग आटोक्यात आली. आगीत उसासह ठिबक सिंचन, सोलर, पाईप, स्प्रिंकलर, केबल असे कोट्यवधी रुपयांचे साहित्य जळाले. जळीत झालेल्या ऊस क्षेत्राचे व शेती साहित्याचे पंचनामे करून नुकसानीची तातडीने भरपाई द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे. आगीच्या घटनेत तीन गावांतील पन्नासपेक्षा अधिक शेतकऱ्यांचे दीडशेहून अधिक एकर क्षेत्रातील ऊसपीक जळून खाक झालेले असताना तालुका प्रशासनातील एकही प्रमुख अधिकारी पाहणीसाठी आला नाही. त्यामुळे ऐन दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांविषयी प्रशासकीय पातळीवरील असंवेदनशीलता दिसून येते आहे. दरम्यान, महावितरणचे शेवगावचे कनिष्ठ उपअभियंता योगेश ठाकरे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. याबाबतचा अहवाल वरिष्ठ कार्यालयास पाठवला आहे. विद्युत निरीक्षकांच्या प्रत्यक्ष पाहणीशिवाय आगीच्या कारणांबाबत आणि बाधित क्षेत्राबाबत अधिक स्पष्टपणे सांगता येणे अशक्य आहे असे ते म्हणाले.


















