अहिल्यानगर : प्रवरा साखर कारखान्याने गेल्यावर्षी अशोक साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील १ लाख २२ हजार टन उसाचे गाळप केले. कारखान्याने वेळेत पैसे अदा करून शेतकऱ्यांचा विश्वास संपादित केला. कोणत्याही कारखान्याविरुद्ध राजकारण करण्याचा आपला प्रयत्न नाही. अशोकच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना येणाऱ्या पाटपाण्याच्या व विजेच्या अडचणी आपण सोडवणार आहोत. शेतकऱ्यांनी लेखी पत्राद्वारे आपल्या तक्रारी द्याव्यात. त्यांची सोडवणूक करण्याची जबाबदारी घेतो, अशी ग्वाही माजी खासदार तथा प्रवरा साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे-पाटील यांनी दिली. तालुक्यातील कारेगाव येथे शुक्रवारी आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.
सुजय विखे-पाटील म्हणाले की, आजपर्यंत अनेकवेळा कार्यकर्त्यांनी अशोक कारखाना निवडणूक लढवण्याची मागणी केली होती. मात्र, आपण त्यास नकार दिला. कोणाचाही सहकार बंद पडू नये अशीच भूमिका राहिली आहे. शेतकऱ्यांना ऊस पुरवठा करताना कारखाना निवडण्याचा पूर्ण अधिकार आहे. उसाच्या दराची तसेच वेळेत पैसे मिळण्याची हमी असणाऱ्या कारखान्याला शेतकरी ऊस देतील. यावेळी भाजप नेते दीपक पटारे, माजी नगराध्यक्ष संजय फंड, श्रीनिवास बिहाणी, शरद नवले, आशिष धनवटे, संजय गांगड, गिरीधर आसने, भीमराव बांद्रे, बाबासाहेब चिडे, राधाकृष्ण आहेर, अभिषेक खंडागळे, रामभाऊ लिट्टे, किशोर बनकर आदी यावेळी उपस्थित होते.


















