अहिल्यानगर : मुळा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या दिवशी सतरा संचालक बिनविरोध झाले होते. तर शनिवारी चार जागांच्या निवडणुकीत गडाख गटाने मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. या निवडणुकीत डॉ. ज्ञानेश्वर दरंदले (६७२५), चंद्रकांत टेमक (६८९५), चांगदेव दहिफळे (७४०१) विमल सोनवणे ७१८२ मते घेऊन विजयी झाल्या. या निवडणुकीत आमदार विठ्ठल लंघे गटाचे पराभूत उमेदवार किरण जाधव यांना १०४१, नारायण डौले यांना ८४७ मते मिळाली. करजगाव गटात ३२५ मते तर महिला राखीव गटात १४० मते बाद झाली.
निवडणूक प्रचारात उद्योजक प्रभाकर शिंदे यांनी ‘मुळा’च्या अहवालावर तसेच गडाखांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढताना सोडलेले टीकेचे बाण प्रत्यक्ष मतदानात उपयोगी पडले नाहीत. लंघे यांनी हातचा राखून केलेले भाष्य सभासद, तालुक्यातील गावागावात सध्या चर्चेत आहे. निकाल लागल्यानंतर विजयी उमेदवारांच्या जल्लोषात मिरवणुका काढण्यात आल्या. ग्रामपंचायती व सर्वच सहकारी संस्थेत दबदबा असताना विधानसभा निवडणुकीत गडाखांचा निसटता पराभव झाल्याने कार्यकर्ते नाराज होते. आताच्या या निकालात गडाख गटाचा वरचष्मा राहिला आहे. दरम्यान, गडाख गटाला पाठिंबा देऊनही मिराबाई दिवटे यांना १००० मते पडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.


















