अहिल्यानगर : ट्रकद्वारे होणाऱ्या ऊस वाहतुकीतील अडचणी सोडविण्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांचे आश्वासन

अहिल्यानगर : आमदार राधाकृष्ण विखे-पाटील सहकारी ट्रक्स वाहतूक संस्थेची ४९ वी वार्षिक सभा संस्थेचे अध्यक्ष नंदकिशोर राठी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उसाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या जुगाडापुढे (डबल ट्रॉली) ट्रकमालक व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी हतबलता व्यक्त केली. वार्षिक सभेत प्रामुख्याने संस्थेच्या अडचणींवर चर्चा झाली.

डबल ट्रॉली जोडून होत असलेल्या वाहतुकीमुळे ट्रक व्यावसायिक अडचणीत येत असल्याचा मुद्दा मांडण्यात आला. यावेळी उपस्थित पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पदाधिकारी व संस्थेशी संलग्नित सभासदांचे प्रश्न जाणून घेतले. सभेदरम्यान विखे पाटील यांनी भाषणाच्या नेहमीच्या पद्धतीला फाटा देत फक्त अडीअडचणी जाणून घेतल्या. त्यांची सोडवणूक करण्याचे आश्वासन दिले.

ChiniMandi WhatsApp Channel

संस्थेचे अध्यक्ष राठी यांनी राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच कारखान्याच्या सहकार्याने संस्थेची सुरू असलेली वाटचाल सांगितली. ट्रकसंस्थेचा कारभार व सर्वच साखर कारखान्यांना भेडसावणाऱ्या ऊसतोडणी कामगारांची समस्या, त्यामागील कारणे व उपाययोजना याचाही ऊहापोह झाला. संजय मोरे यांनीही जुगाडामुळे निर्माण झालेल्या ऊस वाहतूक व्यवस्थापनातील अडचणी सांगितल्या. ट्रॅक्टरद्वारे ऊस वाहतूक करताना केल्या जाणाऱ्या जुगाडामुळे या व्यवसायापासून ट्रकमालक दुरावत चालल्याची माहिती देण्यात आली. सुनील जाधव यांनी प्रास्ताविक केले.

व्यवस्थापक जे. आर. खर्डे यांनी अहवालवाचन केले. जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अण्णासाहेब म्हस्के, प्रवरा सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. भास्करराव खर्डे, ट्रक्स संस्थेचे उपाध्यक्ष सुनील जाधव, राहाता बाजार समितीचे उपसभापती अण्णासाहेब कडू, सहायक निबंधक नामदेवराव ठोंबळ, संभाजी देवकर, शांतीनाथ आहेर, साहेबराव दळे, चंद्रकांत म्हस्के, प्रवरा बँकेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सौरभ बालोटे, साखर कारखान्याचे शेती विभागाचे मुख्य व्यवस्थापक संजय मोरे आदी उपस्थित होते.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here