अहिल्यानगर : दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी लक्षात घेऊन कर्मवीर काळे सहकारी साखर कारखान्याने सन २०२६-२७ च्या गाळप हंगामासाठी प्रतिमेट्रिक टन ३,२०० रुपये पहिली उचल देण्याची घोषणा केली आहे. तसेच जानेवारीनंतर गाळपासाठी येणाऱ्या उसाला कालावधीनुसार विशेष अनुदान देण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे यांनी दिली. कारखान्याच्या ७२ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ रविवारी ज्येष्ठ संचालक व मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे आणि जिल्हा बँकेच्या माजी संचालिका पुष्पाताई काळे यांच्या हस्ते विधिवत पूजन करून करण्यात आला. यावेळी आमदार आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत गव्हाणीत उसाची मोळी टाकून गाळप हंगामाचा प्रारंभ झाला.
जानेवारीनंतरच्या उसाला टप्प्याटप्प्याने अनुदान
ऊसदरासाठी इतरांच्या निर्णयाची वाट न पाहता शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या उद्देशाने कारखान्याने हा निर्णय घेतल्याचे आमदार काळे यांनी सांगितले. यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आहेत. त्यामुळे त्यांच्या हिताचा विचार करून पहिली उचल ३,२०० रुपये प्रतिमेट्रिक टन देण्यात येणार आहे. याशिवाय जानेवारीनंतर गाळपासाठी येणाऱ्या उसाला विशेष अनुदान देण्याचेही जाहीर करण्यात आले.
अनुदानाचे स्वरूप पुढीलप्रमाणे असेल.
१ ते १५ जानेवारी : प्रतिमेट्रिक टन १०० रुपये
१६ ते ३१ जानेवारी : प्रतिमेट्रिक टन १५० रुपये
१ ते १५ फेब्रुवारी : प्रतिमेट्रिक टन २०० रुपये
१६ फेब्रुवारीनंतर : प्रतिमेट्रिक टन २५० रुपये
गोदावरी कालव्यांची दोन आवर्तने देण्याबाबत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संकेत दिले असले, तरी प्रत्यक्षात पाण्याची उपलब्धता कशी राहील, याबाबत निश्चितता नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी आणि त्यांना दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे आमदार काळे यांनी स्पष्ट केले.
पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन
दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता शेतकऱ्यांनी पाण्याचा वापर जपून करावा आणि उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करावे, असे आवाहन आमदार आशुतोष काळे यांनी केले. कमी वाढ झालेल्या उसाचे खोडवे राखून पुढील वर्षाच्या गाळपासाठी पीक उपलब्ध होईल, याची काळजी घ्यावी. नवीन ऊस लागवड करताना कमी पाण्यात अधिक उत्पादन देणाऱ्या पद्धतींचा अवलंब करावा, असेही त्यांनी सांगितले. ऊस पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी आधुनिक सिंचन प्रणालीचा वापर करावा. ठिबक सिंचनासारख्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पाण्याची बचत करून उत्पादन वाढविण्यावर भर द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
संचालक मंडळ व मान्यवरांची उपस्थिती
गळीत हंगामाच्या शुभारंभप्रसंगी कारखान्याचे उपाध्यक्ष दिनार कुदळे, ज्येष्ठ कार्यकर्ते राजेंद्र जाधव, पद्माकांत कुदळे, बाळासाहेब कदम, नारायणराव मांजरे, ज्ञानदेव मांजरे, बाबासाहेब कोते, संभाजीराव काळे, सोमनाथ चांदगुडे, बाळासाहेब जपे यांच्यासह संचालक प्रवीण शिंदे, सूर्यभान कोळपे, सुधाकर रोहोम, दिलीपराव बोरनारे, डॉ. मच्छिंद्र बर्डे, राजेंद्र घुमरे, शंकरराव चव्हाण, सचिन चांदगुडे, श्रीराम राजेभोसले, राहुल रोहमारे आणि अनिल कदम उपस्थित होते. तसेच कारखान्याचे कार्यकारी संचालक सोमनाथ बोरनारे, जनरल मॅनेजर सुनील कोल्हे, ज्ञानेश्वर आभाळे, बाबा सय्यद, संदीप शिरसाठ, निवृत्ती गांगुर्डे, मुख्य रसायनतज्ज्ञ सूर्यकांत ताकवणे आणि शेतकी अधिकारी निळकंठ शिंदे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनरल मॅनेजर सुनील कोल्हे यांनी केले, तर उपाध्यक्ष दिनार कुदळे यांनी आभार मानले.


















