अहिल्यानगर : ऊस दराच्या प्रश्नावर आज बैठक; प्रतिटन ५ हजार रुपयांची मागणी

अहिल्यानगर : ऊस गाळप हंगाम २०२६-२७ सुरू करण्यापूर्वी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आज, सोमवार (दि. ५) दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. राज्य साखर आयुक्तांच्या आदेशानुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक होणार आहे.

प्रतिटन ५ हजार रुपये दर किंवा प्रति टन १००० रुपये अनुदान

ChiniMandi WhatsApp Channel

बैठकीस शेतकरी प्रतिनिधींसह साखर सहसंचालक, पोलिस अधीक्षक, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, वैधमापनशास्त्र विभागाचे अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, विशेष लेखापरीक्षक तसेच अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यातील सहकारी व खासगी साखर कारखान्यांचे चेअरमन, कार्यकारी संचालक आणि जनरल मॅनेजर उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उसाला प्रतिटन ५ हजार रुपये दर जाहीर करावा, अशी मागणी शिवसेना नेते अभिजित पोटे यांनी केली आहे. हा दर देणे शक्य नसल्यास ऊस पिकाला प्रतिटन १ हजार रुपये अनुदान देऊनच साखर कारखाने सुरू करावेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

कमी पावसाचा ऊस उत्पादनावर परिणाम

यंदा कमी पर्जन्यमानामुळे अनेक भागांत उसाची अपेक्षित वाढ झालेली नाही. अशा परिस्थितीत ऑक्टोबरमध्ये गाळप हंगाम सुरू केल्यास अपरिपक्व ऊस कारखान्यांकडे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे साखर उतारा कमी होऊन शेतकऱ्यांना मिळणाऱ्या दरावरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. थंडीच्या कालावधीत उसाची वाढ तसेच त्यामधील साखर तयार होण्याची प्रक्रिया वेगाने होते. त्यामुळे २०२६-२७ चा गाळप हंगाम नोव्हेंबरअखेर किंवा डिसेंबरमध्ये सुरू करावा, अशी मागणी पोटे यांनी केली आहे.

मागील हंगामातील नियमभंगाचा आरोप

सन २०२५-२६ च्या गाळप हंगामात काही साखर कारखान्यांनी नियमांचे उल्लंघन करून जादा वाहतूक खर्च दाखविल्याचा तसेच साखर उतारा कमी दाखविल्याचा आरोप अभिजित पोटे यांनी केला आहे. या कारणांमुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अपेक्षेपेक्षा कमी दर मिळाल्याचे त्यांनी म्हटले आहे. या सर्व तांत्रिक बाबींवर आजच्या बैठकीत सविस्तर चर्चा करून शेतकऱ्यांच्या हिताचा योग्य निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. ऊस दर, गाळप हंगामाची सुरुवात, साखर उतारा आणि वाहतूक खर्च यांसारखे महत्त्वाचे प्रश्न आजच्या बैठकीत चर्चेला येणार असल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे या बैठकीकडे लक्ष लागले आहे.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here