अहिल्यानगर : पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील साखर कारखाना व जनसेवा फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने ऊस पिकावर ड्रोनद्वारे औषध फवारणी मोहिमेचा श्रीगणेशा करण्यात आला. या उपक्रमामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार आहे. कमी वेळेत, प्रभावी पद्धतीने रोग किडींचे नियंत्रण करण्यास मदत होणार आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नातून ही संयुक्त मोहीम राबविण्यात येत आहे. ऊस पिकातील कीड, रोगांचा फैलाव रोखण्यासाठी कारखान्याने हे प्रयत्न चालवले आहेत.
कारखान्याच्या ऊस विकास विभागामार्फत शेतकऱ्यांना रोग- किर्डीच्या नियंत्रणासाठी मार्गदर्शन करण्याबरोबरच आवश्यक औषधांचा अल्प दरात पुरवठा करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून ड्रोन फवारणीचे प्रात्यक्षिक पार पडले. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष सोपान शिरसाठ, संचालक ज्ञानेश्वर खर्डे, शेतकी अधिकारी संतोष एलम, नकुल कटारे, दिग्विजय देशमुख, जनसेवा फाउंडेशन प्रकल्प अधिकारी रुपाली लोंढे, निलेश गागरे व ड्रोन दीदी यांच्यासह कृषी अधिकारी, कर्मचारी व ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते. कमी पावसामुळे ऊस पिकावर पांढरा लोकरी मावा, तपकिरी ठिपका तसेच पायरी यांसारख्या रोग-किडींचा प्रादुर्भावाचे वेळीच नियंत्रण करण्यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत. याबाबत कारखान्याचे उपाध्यक्ष सोपान शिरसाट म्हणाले की, ‘ऊस उत्पादन वाढीसाठी पावसाची आवश्यकता असते, मात्र यंदा पावसामध्ये मोठा खंड पडल्याने ऊस क्षेत्रावर विविध रोग व किडींचा प्रादुर्भाव जाणवत आहे. शेतकऱ्यांनी ऊस पिकाची नियमित पाहणी करून, रोग-किडींची लक्षणे आढळताच कृषी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार नियंत्रण उपाययोजना कराव्यात.


















