अहिल्यानगर : पारनेर कारखाना विक्रीचा व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात, पोलिसांकडून चौकशी सुरू

अहिल्यानगर : देवीभोयरे येथील पारनेर सहकारी साखर कारखाना विक्रीच्या कथित गैरव्यवहार प्रकरणाच्या पोलिस तपासाला पुन्हा एकदा वेग आला आहे. पुण्यातील बडे उद्योजक अतुल चोरडिया व अशोक चोरडिया या बंधूंना पारनेर पोलिसांनी चौकशीसाठी हजर राहण्याबाबत नोटीस बजावली आहे. चोरडिया बंधूंना गेल्या आठवड्यात पहिली नोटीस पाठवली होती. परंतु, प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत ते उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे तपासी अधिकारी सोमनाथ दिवटे यांनी पुन्हा नोटीस बजावली असून येत्या सोमवारी पारनेर पोलिस ठाण्यात चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे.

दरम्यान, २०२५ मध्ये पारनेर न्यायालयाने देवीभोयरे येथील सहकारी साखर कारखाना विक्री घोटाळा प्रकरणी राज्य सहकारी बँकेचे दोन अधिकारी, क्रांती शुगर कंपनीचे नऊ संचालक, देवीभोयरेच्या तत्कालीन तलाठ्यांवर गुन्हा दाखल करून तपासाचे आदेश दिले होते. पारनेर बचाव समितीचे अॅड. रामदास घावटे यांनी पोलिसांकडे या प्रकरणाचा पाठपुरावा सुरू ठेवला आहे. जून २०२६ मध्ये या गुन्ह्याचा तपास पारनेर न्यायालयाच्या देखरेखीखाली चालवण्याचे आदेश झाल्यानंतर थंडावलेल्या तपासाला आता गती मिळाली आहे. पुण्यात रिअल इस्टेट व्यावसायिक असलेल्या अतुल चोरडिया आणि अशोक चोरडिया यांनी या गुन्ह्यातील ९ आरोपींच्या बँक खात्यांवर २३ कोटी रुपये वर्ग केल्याचा आरोप आहे. त्या रकमेतून ‘क्रांती कारखान्या’ची खरेदी करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता.

ChiniMandi WhatsApp Channel

राज्य सहकारी बँकेकडून पारनेर कारखाना लिलावात खरेदी करण्यासाठी चोरडिया बंधूंनी माजी खासदार विदुरा नवले यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या ९ वेगवेगळ्या खात्यांवर २३ कोटींची रक्कम वर्ग केली होती. नवले कुटुंबातील सदस्यांच्या जबाबानुसार, ही रक्कम २०१५ मध्ये जमीन विकासकाच्या हेतूने खात्यावर पाठवली. मात्र, या संचालकांनी ही रक्कम त्यांच्या ‘क्रांती शुगर कंपनी’त न गुंतवता थेट महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला परस्पर पाठवली व त्या बदल्यात ‘क्रांती शुगर’करिता कारखान्याची मालमत्ता खरेदी केली, असा आक्षेप तक्रारदारांचा आहे. त्या मालमत्तेवर राज्य सहकारी बँकेकडून ३४० कोटींचे कर्ज काढून हा काळा पैसा पांढरा केल्याचा आरोप बचाव समितीने केला आहे.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here