अहिल्यानगर : सहकारमहर्षी थोरात कारखान्याच्यावतीने ऊस विकास मेळावा, एआय तंत्राविषयी करणार मार्गदर्शन

अहिल्यानगर : सहकारमहर्षी थोरात सहकारी साखर कारखाना, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी, कृषी विज्ञान केंद्र, बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने ऊस शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी विविध नवनवीन उपक्रम राबविण्यात येत आहेत. आता एकरी ऊस उत्पादन वाढविण्यासाठी माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी (ता.३) सकाळी साडेदहा वाजता खांडगाव (ता. संगमनेर) येथील बेणेमळा येथे भव्य ऊस विकास मेळाव्याचे आयोजन केले आहे. कारखान्याचे उपाध्यक्ष पांडुरंग पाटील घुले यांनी ही माहिती दिली. शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करून एकरी ऊस उत्पादन वाढविणे ही काळाची गरज आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ऊस शेतीतील उत्पादनवाढीसह खर्चात बचत करण्याच्या आधुनिक पद्धतींची माहिती शेतकऱ्यांना मिळावी, यासाठी या ऊस विकास मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे असे त्यांनी सांगितले.

उपाध्यक्ष घुले म्हणाले की, ऊस हे शेतकऱ्यांसाठी शाश्वत उत्पन्न देणारे पीक असल्याने एकरी उत्पादनात वाढ व्हावी, यासाठी नेहमीच प्रयत्न सुरू आहेत. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श तत्त्वांवर संगमनेरचा सहकार आणि साखर कारखान्याची वाटचाल सुरू आहे. कारखान्याने कायम तालुक्याच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सध्या शेतीमालाला अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आहे. अशा परिस्थितीत ऊस हे शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न देणारे पीक ठरत आहे. त्यातून उत्पादन वाढ व्हावी यासाठी प्रयत्न केले जातील. मेळाव्याला माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात आणि माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, डॉ. जयश्री थोरात, अॅड. माधवराव कानवडे, दुर्गा तांबे, लहानभाऊ गुंजाळ, शंकर खेमनर, सुधाकर जोशी, रणजितसिंह देशमुख आदी उपस्थित राहणार असल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी दिली.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here