अहिल्यानगर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या आकडेवारीनुसार यंदा जिल्ह्यात २ लाख १२ हजार हेक्टर ऊस गाळपासाठी उपलब्ध आहे. गतवर्षीच्या तुलनेत ६७ हजार हेक्टर क्षेत्रातील जास्तीचा ऊस उपलब्ध झाला आहे. जिल्ह्यात २१ साखर कारखाने गाळप करणार आहेत. सहकारी साखर कारखान्यांची दररोज ५७ हजार ९५० मेट्रिक टन ऊस गाळप करण्याची क्षमता आहे. त्या तुलनेत खासगी कारखान्यांची गाळप क्षमता कमी आहे. खासगी कारखान्यांत प्रतिदिन ४१ हजार ५०० मेट्रिक टन गाळप केले जाते. जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत गाळप क्षमतेत वाढ केली आहे.
यंदा जून, जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यांत पुरेसा पाऊस पडला नाही. त्यामुळे ऊस उत्पादनात घट येणार आहे. कारखान्यांनी प्रती हेक्टरी ६३ टन उत्पादन मिळेल, असा अंदाज दिला आहे. प्रत्यक्षात त्याहीपेक्षा कमी उत्पादन मिळेल अशी शक्यता आहे. लवकर गाळप सुरू केल्यास किमान २० टक्के घट होईल अशी भीती शेतकरी संघटनेचे (रघुनाथदादा) जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांनी व्यक्त केली.
देशभरात मागणीच्या तुलनेत साखरेचा पुरवठा कमी झाला आहे. त्यामुळे बाजारात साखरेची तुट निर्माण झाली आहे. परिणामी गत महिन्यात साखरेचे दर अचानक वाढले होते. साखरेचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारने साखर आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच गळीत हंगाम लवकर सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचा ऊस उत्पादक शेतकऱ्यांसह साखर कारखानदारांना फटका बसू शकतो अशी भीती व्यक्त होत आहे.
मागील दोन वर्षे चांगला पाऊस पडल्याने यंदा जिल्ह्यातील उसाचे गाळप क्षेत्र वाढले आहे. परंतु, चालूवर्षी पुरेसा पाऊस पडला नाही. त्याचा परिणाम उत्पादनावर होणार आहे. पोषक वातावरण न मिळाल्याने ऊसात साखर योग्य पद्धतीने भरली जात नाही. अशा परिस्थितीत सरकारची गाळप हंगाम सुरू करण्याची घाई सुरू आहे. त्याचा फटका बसू शकतो असे साखर उद्योगातील जाणकारंचे मत आहे. कार्यक्षेत्राबाहेरचा ऊस आणण्यासाठी कारखान्यांत जणू स्पर्धा लागते. यंदाही तीव्र स्पर्धा पाहायला मिळणार आहे. त्यामुळे कच्चा ऊस गाळपासाठी येऊ शकतो. त्यामुळे उतारा कमी येईल. त्याचा फटका शेतकऱ्यांना सोसावा लागणार आहे.


















