बीड: ट्रॅक्टर मालकाला ऊसतोड मजूर पुरवठा करून देण्याचे आश्वासन देऊन १३ लाख ४८ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी होळ (ता. केज) येथील भीमराव उत्तमराव घुगे यंनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर युसफवडगाव पोलिस स्थानकात कल्याण बापूराव मुंडे (रा. ताडसोन्ना, ता. बीड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १६ कोयते म्हणजेच ३२ ऊसतोड मजूर पुरविण्यासाठी १६ लाख रुपयांचा व्यवहार ठरला होता. त्यासाठी १६ लाख रुपये उचल देण्यात आली होती. मात्र, मजूर न पुरवता फसवणूक करण्यात आल्याचा आरोप आहे.
पोलिसांनी सांगितले की, होळ (ता. केज) येथील ट्रॅक्टरमालक भीमराव उत्तमराव घुगे यांनी गळीत हंगाम २०२४-२५ साठी कर्नाटकातील बालाजी शुगर फॅक्टरीसोबत ऊस वाहतुकीचा करार केला. त्यासाठी १५ मे २०२४ रोजी कल्याण मुंडे यांच्यासोबत बैठक झाली. त्यामध्ये ३२ ऊसतोड मजूर पुरविण्यासाठी १६ लाख रुपयांचा व्यवहार ठरला. घुगे यांनी सुरुवातीला दीड लाख रुपये रोख दिले. त्यानंतर ऑनलाइन आणि रोख स्वरूपात १५ लाख रुपये मुंडे याला दिले. मात्र, त्याने फक्त १२ मजूर पुरवले. हे मजूरसुद्धा काही दिवसांत काम सोडून निघून गेले. उर्वरित मजूर पुरविण्याबाबत वारंवार विचारणा करूनही मुंडे याने टाळाटाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. कल्याण मुंडेने पैसे परत देण्याचे आश्वासन दिले. मात्र, त्याचे पालन केले नाही. मजुरांनी १ लाख ५२ हजार रुपयांचे काम केले. उर्वरित १३ लाख ४८ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अमजद सय्यद करीत आहेत.

















