बीड : लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाअंतर्गत बीड शहरातील पहिले सुसज्ज शासकीय वसतिगृह पूर्ण झाले आहे. वसतिगृहात पाचवीपासून पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या १०० विद्यार्थ्यांना मोफत निवास, भोजन आणि आधुनिक शैक्षणिक सुविधा मिळणार आहेत. शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळणाऱ्या ऊसतोड कामगारांच्या पाल्यांना कोणत्याही अडचणीशिवाय शिक्षण घेता यावे, यासाठी प्रशासनाने उत्तम सोयी-सुविधांची आखणी केली आहे. यात पलंग, गादी, चादर व उशी यांसह राहण्याची उत्तम सोय. तसेच दररोज सकाळी पौष्टिक नाश्ता आणि दोनवेळचे मोफत जेवण, विद्यार्थ्यांचा दैनंदिन शैक्षणिक खर्च भागविण्यासाठी जिल्हा स्तरावर १,३०० रुपये, तर तालुका स्तरावर एक हजार रुपये प्रतिमहिना थेट बँक खात्यात दिले जातील. मुलींसाठी १५० रुपये अतिरिक्त भत्ता असेल. मोफत गणवेश, शालेय साहित्य, क्रीडा साहित्य, अद्ययावत ग्रंथालय आणि संगणक कक्ष तेथे उपलब्ध असेल.
ऊसतोड कामगारांच्या मुलांचे शिक्षण विस्कळित होऊ नये यासाठी राज्यातील १० जिल्ह्यांतील ८२ शासकीय वसतिगृहांच्या योजनेत बीडला विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. दहा जिल्ह्यांतील ४१ तालुक्यांमध्ये मुलांसाठी ४१ आणि मुलींसाठी ४१ अशी एकूण ८२ शासकीय वसतिगृहे (प्रत्येकी १०० विद्यार्थी क्षमता) उभारण्यास मान्यता देण्यात आली होती. यापैकी पहिल्या टप्प्यात २० वसतिगृहे भाड्याच्या इमारतींमध्ये सुरू करण्यात आली. तथापि, भाड्याच्या जागेवरील मर्यादा लक्षात घेता, उर्वरित ६२ वसतिगृहांच्या स्वतंत्र व सुसज्ज शासकीय इमारतींचे बांधकाम हाती घेण्यात आले आहे. यामध्ये बीडचे हे वसतिगृह आता सज्ज झाले आहे. वसतिगृहाची सर्वात मोठी विशेष बाब म्हणजे येथे प्रवेशासाठी जातीची किंवा उत्पन्नाची कोणतीही अट नाही. विद्यार्थी हा केवळ ऊसतोड कामगाराचा पाल्य असणे हा एकमेव निकष आहे. जिल्ह्यासाठी ११ नवीन वसतिगृहांच्या उभारणीकरिता राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने १५९ कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी मंजूर केला आहे. याशिवाय, शिरूर कासार वसतिगृहाचे काम अंतिम टप्प्यात असून गेवराईमध्ये २, माजलगावमध्ये २, केजमध्ये २, परळीमध्ये २ आणि पाटोदामध्ये २ अशा १० वसतिगृहांच्या बांधकामाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता मिळाली असून प्रक्रिया वेगाने सुरू आहे.


















