बीड : राज्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम जवळ येत असताना ऊस तोडणीसाठी मुकादमांकडून करार प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे. ऊसतोड मजुरांची जमवाजमव, कोयत्यांचे करार तसेच वाहनधारकांशी बोलणी यामुळे ग्रामीण भागात हालचाली वाढल्या आहेत. यांत्रिक युगाचा प्रभाव शेतीसह सर्वच क्षेत्रांवर वाढत असून, पारंपरिक बैलगाडी वाहतुकीची जागा आता ट्रॅक्टर, ट्रक आणि यांत्रिक ऊसतोड मशिनांनी घेतल्याचे चित्र दिसत आहे.
काळानुसार शेतीचे यांत्रिकीकरण वाढल्याने बैलगाडीची गरज कमी होत गेली. सध्या बहुतांश कारखाने वेळेची बचत आणि जलद वाहतूक याला प्राधान्य देत असल्याने ट्रॅक्टर आणि ट्रकला मोठी मागणी वाढली आहे. सध्या विविध साखर कारखान्यांचे मुकादम, वाहनमालक आणि ऊसतोड मजूर यांच्यात करार सुरू आहेत. मुकादमांकडून मजुरांना आगाऊ रक्कम देऊन कोयत्यांची जमवाजमव केली जात आहे. ऊस वाहतुकीसाठी ट्रॅक्टर-ट्रक आणि ऊस तोडणीसाठी मशिनांचा वापर वाढल्याने पारंपरिक बैलगाडी व्यवसाय संकटात सापडला आहे. साखर कारखान्यांकडून ट्रक, ट्रॅक्टर आणि इतर वाहनधारकांशी मोठ्या प्रमाणात करार केले जात आहेत.


















