बीड : माजलगाव तालुक्यातील पवारवाडी येथील खासगी तत्त्वावरील जय महेश साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. बॉयलरमधून निर्माण होणाऱ्या उपपदार्थावर प्रक्रिया करून कारखान्याने पोटॅश खताची निर्मिती सुरू केली असून, हे खत शेतकऱ्यांना अल्प दरात उपलब्ध करून देण्याचा कारखाना प्रशासनाचा प्रयत्न आहे. यंदाच्या गळीत हंगामात तब्बल २ ते ३ हजार मेट्रिक टन पोटॅश खताचे उत्पादन करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मागील हंगामात प्रायोगिक तत्त्वावर सुमारे २०० टन पोटॅशची निर्मिती करण्यात आली होती.
निपाणी टाकळी येथे मागील वर्षी उभारण्यात आलेल्या बॉयलरमधून उपलब्ध होणाऱ्या उपपदार्थावर प्रक्रिया करून पोटॅश निर्मितीचा हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. रासायनिक खतांच्या वाढत्या किमतींच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवर कमी दरात पोटॅश उपलब्ध झाल्यास शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात बचत होण्यास मदत होणार आहे.परिसरातील शेतकऱ्यांनी कारखान्याला मोठ्या प्रमाणात ऊस देऊन सहकार्य करावे, असे आवाहन कारखान्याचे उपाध्यक्ष नारायण मूर्ती यांनी केले.
दरम्यान, मागील वर्षी प्रायोगिक तत्त्वावर २०० टन पोटॅशचे उत्पादन करण्यात आले होते. यंदा उत्पादन वाढवून २ ते ३ हजार मेट्रिक टन करण्याचे नियोजन आहे. शेतकऱ्यांना हे खत अल्प दरात उपलब्ध करून देण्यासाठी कारखाना प्रशासन प्रयत्नशील असल्याचे कारखाना व्यवस्थापक पारसनाथ जयस्वाल यांनी सांगितले.


















