बीड : जिल्ह्यातील २१ मयत ऊसतोड कामगारांच्या वारसांचे मदतीचे प्रस्ताव सन २०१९ पासून मंजूर होऊनही त्यांच्या खात्यात अद्याप एक रुपयाचीही आर्थिक मदत जमा झालेली नसल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. रस्ते अपघात, पाण्यात बुडून मृत्यू यांसह विविध कारणांनी मृत्यू झालेल्या ऊस तोडणी कामगारांच्या वारसांना मदतीचे प्रस्ताव शासकीय स्तरावर मंजूर असले, तरी यादीतील प्रत्येक प्रकरणासमोर “अनुदान अप्राप्त” असा शेरा नमूद आहे. मयतांच्या वारसांनी वारंवार कार्यालयांचे हेलपाटे मारूनही त्यांच्या पदरात अद्याप कोणतीही आर्थिक मदत पडलेली नसल्याने कुटुंबीय हवालदिल झाले आहेत.
ऊस तोडणी मजुरांच्या मदतीच्या नावाखाली केवळ घोषणा आणि आश्वासनांचाच पाऊस पडतो. प्रत्यक्षात रक्कम मिळत नसल्याची बाब वारंवार स्पष्ट होत आहे. सहायक आयुक्त, समाजकल्याण कार्यालयाकडील उपलब्ध माहितीनुसार. बीड जिल्ह्यातील २१ मयत ऊसतोड कामगारांच्या वारसांची यादी समोर आली आहे. हे कामगार विविध कारणांनी मृत्युमुखी पडले. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना हक्काच्या मदतीसाठी प्रशासनाचे उंबरठे झिजवावे लागत असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. त्यामुळे स्थलांतरित कामगारांच्या प्रश्नांचा तातडीने निपटारा होण्यासाठी आणि अपघातग्रस्तांच्या वारसांना हक्काचा निधी वेळेत मिळण्यासाठी महामंडळाचे कार्यालय बीडमध्येच असावे, अशी मागणी ऊसतोड मजूर संघटनेचे नेते जीवन राठोड यांनी केली आहे. केवळ मृत नव्हे तर गंभीर अपघातात कायमचे अपंगत्व आलेल्या ऊसतोड मजुरांची अवस्थाही अत्यंत दयनीय आहे. गणेश रामू मिसाळ या सहा वर्षांपासून अंथरुणाला खिळलेल्या कामगारालाही मंजूर असलेले अडीच लाख रुपयांचे अनुदान अद्याप मिळालेले नाही.


















