बीड : ऊसतोडणी आणि शेतीतून मिळणाऱ्या तुटपुंज्या उत्पन्नावर राळेसांगवी येथील सोमिनाथ बांगर यांनी मुलाला इंजिनिअर बनवण्याचे शिवधनुष्य यशस्वीपणे पेलले. २१ वर्षीय सूरज सोमिनाथ बांगर या तरुणाने आपल्या जिद्दीच्या जोरावर टाटा समूहात इंजिनिअर म्हणून वार्षिक १० लाख रुपयांचे पॅकेज मिळवले आहे. छोट्याशा राळेसांगवीतून थेट टाटा समूहात १० लाखांचे पॅकेज मिळवणारा सूरज आदर्श ठरला आहे. जिद्द आणि चिकाटी असेल तर यश मिळते, हे त्याने सिद्ध केले. त्याने वडिलांच्या कष्टाला सुवर्ण किनार दिली आहे. त्याच्या या यशाने निगमानंद महाराज विद्यालयाचे प्राचार्य भिलारे, अर्जुन थिटे आणि नरेश घुंगरड यांच्यासह संपूर्ण गावाने त्याचा नागरी सत्कार केला. सूरज आज केवळ एका शेतकरी कुटुंबाचा मुलगा राहिला नसून, तो ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थान बनला आहे.
राळेसांगवी गावात अद्याप नियमित बससेवा पोचलेली नाही. प्रतिकूल परिस्थितीत सूरजचे वडील सोमिनाथ बांगर यांनी अल्पभूधारक शेती आणि हंगामी ऊसतोडणी करून संसाराचा गाडा ओढला. त्यांनी सूरजच्या शिक्षणात कधीही खंड पडू दिला नाही. घरची परिस्थिती बेताची असली तरी वडिलांनी त्याच्यासाठी कष्टाची पराकाष्ठा केली. सूरजने कष्टाची जाणीव ठेवून अभ्यासावर पूर्ण निष्ठा ठेवली. त्याने प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद शाळेत तर बारावीपर्यंतचे शिक्षण मच्छिंद्रगड येथील निगमानंद महाराज विद्यालयात पूर्ण केले. सूरजने सीईटी परीक्षेत घवघवीत यश मिळवून पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळवला. महाविद्यालयीन शिक्षणादरम्यान चांगली तयारी केली आणि अंतिम वर्षात असतानाच त्याने कॅम्पस प्लेसमेंटमध्ये बाजी मारली आणि टाटा समूहात मोठी नोकरी मिळवली. याबाबत सूरज म्हणाले की, माझ्या आई-वडिलांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत माझे शिक्षण पूर्ण केले. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि कुटुंबाच्या त्यागामुळेच हे यश मला मिळाले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी परिस्थितीला दोष न देता मेहनत आणि सातत्य ठेवले, तर कोणतेही स्वप्न पूर्ण होऊ शकते.


















