कोल्हापूर : ऊसदराची कोंडी फुटली नसल्याने अद्याप ऊसतोडीचा हंगाम बंद आहे. त्यामुळे राज्यभरातून शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यांत आलेल्या ऊसतोड मजुरांची कोंडी झाली आहे. साखर कारखान्यांचा परिसर ऊसतोडणी कामगारांच्या झोपड्या, पाल आणि वाहनांनी भरलेला आहे. घराकडून आणलेली बाजरी संपली, तर पुढे काय खायचे, चटणी-मिठासाठीही पैसे कुठून आणायचे असे असंख्य प्रश्न त्यांच्यासमोर उभे आहेत. त्यांच्या जगण्यातील ही अस्वस्थता प्रकर्षाने जाणवत आहे. काही कारखान्यांवर येऊन या कामगारांना पंधरा दिवस उलटले आहेत. मात्र, ऊसतोडणी सुरू नाही. आधीच दुष्काळी परिस्थिती, पाण्याची चिंता आणि आता दराच्या आंदोलनामुळे कारखाने बंद असल्याने ऊसतोड मजुरांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
जिल्ह्यात सध्या ऊस दरासाठीच्या आंदोलनाने वेग घेतला आहे. मात्र, थंडीच्या भल्या पहाटे हातात कोयता घेऊन उसतोडीवर जाणाऱ्या ऊसतोड मजुरांवर सध्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कित्येक वर्षांपासून ऊसतोडणी कामगारांचे आयुष्य याच चक्राभोवती फिरत आहे. मात्र, यंदा हंगाम सुरू होऊनही त्यांच्या हाताला काम मिळत नाही. ऊस तोडला तरच पैसे मिळणार. कामच मिळाले नाही, तर उचल कशी फिटणार? पंधरा दिवसांपासून बहुतांश ऊसतोडणी कामगार बसून आहेत. ऊस दराच्या प्रश्नी तातडीने निर्णय होऊन कारखाने सुरू करावेत आणि आमचे काम सुरू व्हावे अशी अपेक्षा ऊसतोड मजुरांकडून व्यक्त केली जात आहे.


















