बीड : हिशोबाच्या बहाण्याने ५९ वर्षीय ऊसतोड मजुराला आठवडाभर डांबून ठेवत त्याला अमानुष मारहाण केल्याची घटना धारूर तालुक्यातील कोयाळ येथे घडली आहे. पाथरी (जि. परभणी) येथील त्र्यंबक आश्रुबा घोरपडे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी सिरसाळा पोलिस ठाण्यात कोयाळच्या सरपंचासह आठ जणांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. संशयितांनी मजुराचे घर जबरदस्तीने लिहून घेतले असून, कोऱ्या चेकवर सह्या घेऊन जीवे मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी विनायक बाबूराव मुंडे, सुग्रीव बाबूराव मुंडे, कोयाळचे सरपंच राजाभाऊ मुंडे, गोविंद मुंडे, शंकर मुंडे यांसह इतर तिघांविरुद्ध सिरसाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घोरपडे हे ऊसतोड मजूर पुरवतात. त्यांनी धारूर तालुक्यातील कोयाळ येथील विनायक बाबुराव मुंडे यांच्या सांगण्यावरून ८ जोडी उसतोड कामगार पुरवले होते. याचा हिशोब करण्यासाठी विनायक मुंडे यांनी त्यांना १० मार्च रोजी कोयाळ येथे बोलावून घेतले. मात्र, तिथे गेल्यावर ‘तुझ्याकडे आमचे १० लाख रुपये निघतात,’ असे म्हणत विनायक मुंडे आणि त्यांच्या साथीदारांनी घोरपडे यांना धमकावले. संशयितांनी घोरपडे यांना १० मार्च ते १८ मार्च या कालावधीत विनायक मुंडे यांच्या घरात डांबून ठेवले. त्यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. शिळे अन्न देऊन त्यांचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. यादरम्यान आरोपींनी घोरपडे यांचे पाथरी येथील घर बनावट नोटरी बनवून स्वतःच्या नावावर लिहून घेतले. तसेच बँक ऑफ महाराष्ट्रच्या चेकबुकमधील चार कोऱ्या चेकवर जबरदस्तीने सह्या करून घेतल्या, असा आरोप आहे.


















