बेळगाव : पाऊस, पीक आणि हवामानाची परिस्थिती आपल्या हातात नसते. हे सर्व निसर्गावर अवलंबून असते. त्यामुळे बदलत्या परिस्थितीनुसार शेतकऱ्यांनी आपल्या शेती पद्धतीत आवश्यक बदल करून आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, असे आवाहन केएलई संस्थेचे मानद अध्यक्ष पद्मश्री डॉ. प्रभाकर कोरे यांनी केले. हारुगेरी येथे शिवशक्ती शुगर्सतर्फे आयोजित शेतकरी सल्लागार समेत ते बोलत होते.
डॉ. कोरे म्हणाले, शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञान आणि शास्त्रीय पद्धतींचा अवलंब करणे काळाची गरज आहे. केएलईचे कृषी विज्ञान केंद्र शेतकऱ्यांना पीक व्यवस्थापन, मृदा परीक्षण, आधुनिक कृषी तंत्रज्ञान, फलोत्पादन, पशुपालन आदी विषर्यावर प्रशिक्षण व मार्गदर्शन देण्यासाठी सदैव तत्पर आहे. बेळगाव जिल्ह्यातील शेतकरी आणि त्यांच्या मुलांना कृषीविषयक ज्ञान तसेच आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध व्हावे, या उद्देशाने कृषी विज्ञान केंद्र स्थापन करण्यात आले आहे. या केंद्राच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांनी आधुनिक शेती पद्धतींचा अवलंब करून उत्पादन व उत्पन्नात वाढ केली आहे. भविष्यातही हे केंद्र शेतकऱ्यांच्या सर्वागीण विकासासाठी अधिक प्रभावीपणे कार्य करेल, असेही डॉ. कोरे यांनी सांगितले.
केवळ उसाच्या पिकावर अवलंबून राहणे शेतकऱ्यांसाठी हितावह नाही. आंतरपीक पद्धतीचा अवलंब केल्यास उत्पन्नात स्थैर्य येते आणि नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसानही कमी करता येते. फळबाग, भाजीपाला, धान्य आणि इतर व्यापारी पिकांची लागवड करून शेतकरी आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम होऊ शकतात. भविष्यात कृषी शिक्षणाचा विस्तार करण्यासाठी आणखी कृषी महाविद्यालये सुरू करण्याचा संस्थेचा मानस आहे, असेही डॉ. प्रभाकर कोरे यांनी सांगितले.
कार्यक्रमास जिन्नाप्पा अस्की, भीमाप्पा बदनिकाई, नेमण्णा नानावी, बसनगौडा असंगी, सिद्धप्पा नागनूर, श्रीधर सदलगी, चिदानंद कोरे कारखान्याचे संचालक भरतेश बनवणे,अजित देसाई, मल्लाप्पा म्हैशाळे, व्यवस्थापकीय संचालक बी. आर. खंडगावे, शिवशक्त्ती शुगर्सचे अधिकारी, कृषी तज्ज्ञ आणि शेतकरी उपस्थित होते.


















