धाराशिव : चालू गळीत हंगामात सोनारी (ता. परंडा) येथील भैरवनाथ साखर कारखान्याकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन ३१०० रुपये दर देण्यात येणार असल्याची घोषणा आमदार प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी केली. तसेच दुष्काळामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकरी, शेतमजूर, भूमिहीन कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांना मदत करण्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून विशेष दुष्काळ निवारण समिती स्थापन करण्यात आली आहे. सोनारी येथील भैरवनाथ शुगर कारखान्यात गुरुवारी (ता. २९) आयोजित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत सावंत बोलत होते.
दुष्काळग्रस्त कुटुंबांची दिवाळी गोड करण्यासाठी विशेष किट
दुष्काळामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या कुटुंबांना दिवाळी सण आनंदात साजरा करता यावा, यासाठी शिवसेनेच्या वतीने विशेष दिवाळी साहित्याचे किट तयार करण्यात आले आहे. या किटमध्ये पाच किलो साखर, एक किलो खाद्यतेल, एक किलो चुरमुरे, अंघोळीचा साबण आणि सुगंधी उटणे यांचा समावेश आहे. शिवसेना, युवासेना आणि महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सहभागातून १ नोव्हेंबरपासून भूम-परंडा-वाशी विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक कुटुंबापर्यंत हे किट पोहोचविण्यात येणार आहे. दिवाळीच्या आदल्या दिवसापर्यंत संपूर्ण मतदारसंघात साहित्य वाटप पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
पशुधनासाठी गावोगावी चारा छावण्या सुरू करणार
दुष्काळी परिस्थितीत पशुधनाचे संरक्षण करण्यासाठीही विशेष उपाययोजना करण्यात येत आहेत. गावनिहाय तसेच जिल्हा परिषद गटनिहाय चारा छावण्या सुरू करण्याबाबत आढावा घेतला जात असल्याचे सावंत यांनी सांगितले.दुष्काळामुळे शेतकरी आधीच आर्थिक संकटात आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांकडून कर्जवसुली करणे किंवा त्यांच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई करणे अन्यायकारक असल्याचे सांगत सावंत यांनी संबंधित यंत्रणांना इशारा दिला.शेतकऱ्यांवरील कर्जवसुली आणि जप्तीची कारवाई तातडीने थांबवावी, अन्यथा शिवसेना स्टाइलने उत्तर दिले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. भूम-परंडा-वाशी मतदारसंघ हा माझा परिवार असून, दुष्काळाच्या संकटात शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य नागरिकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याचे आमदार तानाजी सावंत यांनी यावेळी स्पष्ट केले.


















