भंडारा : ऊस गाळपाला पाठवून तब्बल पाच महिने उलटले तरी मानस ॲग्रो कारखान्याकडून शेतकऱ्यांना अद्याप ऊस बिले मिळालेली नाहीत. ऊस बिलाची प्रतीक्षा करणाऱ्या संतप्त शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. माजी उपसभापती हिरालाल नागपुरे यांनी कारखाना प्रशासनाला धुरांडे बंद पाडण्याचा इशारा दिला आहे. साखर कारखान्यात ऊस गेल्यानंतर १४ दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ऊस बिल जमा होणे बंधनकारक आहे. मात्र, मानस ॲग्रो कारखान्याने जानेवारी महिन्यापासून शेतकऱ्यांची ऊस बिले दिलेली नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
शेतकऱ्यांच्या याप्रश्नावर जिल्हा प्रशासन आणि साखर आयुक्तालयाने तत्काळ लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे. प्रशासनाने मध्यस्थी करून साखर कारखान्याकडून थकीत बिले वसूल करून द्यावेत, अशी मागणी होत आहे. येत्या काही दिवसांत परिसरातील सर्व ४०० बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात उसाचे थकीत बिल जमा झाले नाहीत, तर सिहोरा परिसरातील एकाही शेतकऱ्याचा ऊस आगामी हंगामात या कारखान्याला देणार नाही. केवळ ऊस रोखणेच नव्हे, तर मानस ॲग्रो कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वारावरच हजारो शेतकऱ्यांसह तीव्र ठिय्या आंदोलन छेडून कारखान्याची धुराडी बंद पाडण्यात येईल, असा इशारा माजी उपसभापती हिरालाल नागपुरे यांनी दिला आहे.


















