भीमा कारखान्याकडून यंदा 3,011 रुपये प्रतिटन ऊसदर जाहीर; ‘86032’ वाणाला 200 रुपये दिवाळी भेट

सोलापूर : टाकळी सिकंदर (ता. मोहोळ) येथील स्व. पैलवान भीमराव महाडिक मल्टीस्टेट सहकारी साखर कारखान्याने (भीमा कारखाना) यंदाच्या गळीत हंगामासाठी 3 हजार 11 रुपये प्रतिटन ऊसदर जाहीर केला आहे. हा दर जिल्ह्यातील सर्वाधिक असल्याचा दावा कारखाना व्यवस्थापनाने केला आहे. आगामी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर कारखान्याने ऊस उत्पादकांसाठी विशेष भेटही जाहीर केली आहे. ‘86032’ या ऊस वाणाला प्रतिटन 200 रुपये, तर इतर ऊस वाणांना प्रतिटन 100 रुपये दिवाळी भेट दिली जाणार आहे. कारखान्याचे मार्गदर्शक संचालक तथा खासदार धनंजय महाडिक यांनी ही घोषणा केली.

भीमा कारखान्याच्या कार्यस्थळावर कारखान्याची 51 वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. यावेळी खासदार महाडिक यांनी ऊसदर आणि दिवाळी भेटीची घोषणा केली. सभासदांसाठी आणखी एक महत्त्वाचा निर्णयही त्यांनी जाहीर केला. सलग तीन वर्षे कारखान्याला ऊस गाळपासाठी देणाऱ्या सभासदांना 25 किलो साखर मोफत दिली जाणार आहे. तसेच इतर सभासदांनाही 25 किलो साखर सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

ChiniMandi WhatsApp Channel

साखरेच्या ‘एमएसपी’मध्ये वाढीची मागणी

साखरेची एमएसपी2017 पासून स्थिर आहे. दुसरीकडे, उसाची एफआरपी दरवर्षी वाढत असल्याने साखर कारखान्यांसमोर ऊसदर देताना आर्थिक अडचणी निर्माण होत आहेत. या परिस्थितीत मार्ग काढण्यासाठी काही प्रमुख मागण्या केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शहा यांच्याकडे मांडण्यात येणार असल्याचे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले.

दोन लाख लिटर क्षमतेचा इथेनॉल प्रकल्प

दरम्यान, ऊस लागवडीला चालना देण्यासाठी भीमा नदीला ‘कालव्याचा’ दर्जा देण्याची मागणी कारखान्याचे अध्यक्ष विश्वराज महाडिक यांनी खासदार धनंजय महाडिक यांच्याकडे केली.साखर उद्योग सध्या अडचणींच्या परिस्थितीतून जात असून, साखर कारखान्यांचे गाळपाचे दिवसही कमी होत आहेत. त्यामुळे इथेनॉल निर्मिती हा साखर उद्योगासाठी महत्त्वाचा पर्याय ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले. भीमा कारखान्याला दररोज 2 लाख लिटर उत्पादन क्षमतेचा नवीन इथेनॉल प्रकल्प मंजूर झाला असून, या प्रकल्पाचे काम लवकरच सुरू होणार असल्याची माहिती विश्वराज महाडिक यांनी दिली.सभेतील विषयांचे वाचन कारखान्याचे कार्यकारी संचालक सूर्यकांत शिंदे यांनी केले. यावेळी युवाशक्तीचे अध्यक्ष पृथ्वीराज महाडिक, पुळुजचे सरपंच विश्वास महाडिक, तानाजी गुंड, शिवाजी गुंड, माणिक बाबर, पांडुरंग ताटे, महादेव देठे आदी उपस्थित होते.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here