सोलापूर : टाकळी सिकंदर येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामासाठी ४७वा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा गुरुवारी उत्साहात पार पडला. कारखान्याचे मार्गदर्शक व राज्यसभा खासदार धनंजय महाडिक तसेच चेअरमन विश्वराज महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली यंदाच्या गळीत हंगामासाठी कारखान्याची संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे. यंदा ५ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याची माहिती चेअरमन विश्वराज महाडिक यांनी दिली.
कारखान्याचे संचालक तात्यासाहेब नागटिळक आणि सुजाता नागटिळक यांच्या हस्ते बॉयलर अग्निप्रदीपन करण्यात आले. तसेच संचालिका सिंधू जाधव आणि चंद्रसेन जाधव यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली यंदा दुष्काळी परिस्थितीचा फटका बसल्याने ऊस उपलब्धतेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गळीत हंगाम लवकर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कारखान्यातील सर्व यंत्रणा, तांत्रिक विभाग तसेच गळीत हंगामासाठी आवश्यक असलेली पूर्वतयारीची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. उपलब्ध ऊसाचे नियोजनबद्ध पद्धतीने गाळप करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे कारखान्याचे कार्यकारी संचालक एस. जे. शिंदे यांनी सांगितले. यावेळी कारखान्याचे सुनील चव्हाण, संभाजी कोकाटे, माऊली भगरे यांच्यासह पदाधिकारी, संचालक व कर्मचारी उपस्थित होते.


















