नवी दिल्ली: केंद्र सरकारने देशातील पाच राज्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला असून, अतिवृष्टी, पूर किंवा दुष्काळामुळे सुमारे 6.11 लाख हेक्टर पीक क्षेत्र बाधित झाल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ही माहिती दिली. द न्यू इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, नवी दिल्ली येथे आयोजित राष्ट्रीय कृषी परिषद–रब्बी अभियान 2026 मध्ये चौहान बोलत होते. चौहान यांनी कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्र प्रदेशातील काही भाग, तेलंगणा आणि राजस्थान येथील दुष्काळी परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली.
चौहान म्हणाले की, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील परिस्थितीचा केंद्रीय पथकांकडून आढावा घेतला जाणार आहे. एक केंद्रीय पथक 3 ऑक्टोबर रोजी कर्नाटकचा दौरा करणार असून, महाराष्ट्र सरकारच्या विनंतीनंतर महाराष्ट्रातही केंद्रीय पथक पाठवण्यात येणार आहे. तसेच, आपण स्वतःही बाधित राज्यांचा दौरा करून परिस्थितीचा आढावा घेणार असल्याचे चौहान यांनी सांगितले.
एल निनोचा प्रभाव आणि मान्सूनच्या असमान पावसाच्या पार्श्वभूमीवर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. मान्सून हंगामाच्या अखेरीस भारतात पावसाची सुमारे 12.3 टक्के तूट नोंदवण्यात आली, तर एकूण खरीप पेरणी क्षेत्रात सुमारे 1 टक्क्याने घट झाली आहे. भाताच्या लागवडीखालील क्षेत्रात 16.32 लाख हेक्टरची घट झाली असून, मका आणि कापसाच्या क्षेत्रातही घट झाली आहे. त्याचवेळी बाजरी, उडीद आणि सूर्यफूल यांसारख्या पिकांच्या क्षेत्रात वाढ झाली आहे.
चौहान यांनी सांगितले की, शेतजमीन लागवडीशिवाय पडून राहणार नाही, याची खात्री करणे ही सरकारची तातडीची प्राथमिकता आहे. कमी पाण्यात येणारी, कमी कालावधीत तयार होणारी तसेच स्थानिक माती आणि हवामानाला अनुकूल असलेल्या बियाण्यांच्या व पीक वाणांच्या निवडीसाठी केंद्र सरकार राज्यांना मदत करणार आहे.
दुष्काळी परिस्थितीतही शेतकऱ्यांनी शेती सुरू ठेवावी यासाठी केंद्र सरकार सहकार्य करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. आगामी रब्बी हंगामाचे नियोजन करताना पाण्याची उपलब्धता आणि जमिनीतील ओलावा लक्षात घेण्याच्या सूचना राज्यांना देण्यात आल्या आहेत. तसेच पाण्याची कमतरता असलेल्या भागांमध्ये कमी पाण्यात येणाऱ्या पिकांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.2026-27 या वर्षासाठी सरकारने 373.93 दशलक्ष टन अन्नधान्य उत्पादनाचे लक्ष्य निश्चित केले आहे.


















