छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील कारखान्यांचे बॉयलर पेटले, हंगाम लवकर सुरू करण्याची लगबग

छत्रपती संभाजीनगर : मागील कही वर्षे कारखान्यांकडे मोठ्या प्रमाणात अतिरिक्त ऊस उपलब्ध असल्याने गळीत हंगाम चार महिन्यांपर्यंत चालत असे. काही ठिकाणी ऊसतोडणी यंत्रांच्या साह्यानेही मोठ्या क्षेत्रातील ऊस तोडला जात असे. मात्र, यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे उसाची अपेक्षित वाढ झालेली नाही. त्यामुळे उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. ऊस कमी उपलब्ध असल्याने कारखान्यांना यंदा गळीत हंगाम लवकर आटोपावा लागण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील अनेक साखर कारखान्यांचे बॉयलर पेटले असून, दसऱ्यापूर्वी गळीत हंगाम सुरू होणार आहेत.

यंदाचा हंगाम अडीच ते तीन महिन्यांतच संपण्याची शक्यता असल्याचे मजुरांचे म्हणणे आहे. त्यामुळे दसरा आणि दिवाळीसारखे सणही फडावरच साजरे करावे लागण्याची शक्यता आहे. यंदा मराठवाड्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे ऊस उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. यंदा एका कोयत्याला (जोडीला) एक लाख ७५ हजार ते अडीच लाख रुपयांपर्यंत उचल देण्यात आल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे हंगाम कमी कालावधीचा ठरल्यास उचल फेडण्याचे मोठे आव्हान मजुरांसमोर आहे. मराठवाड्यातील कारखाने दसऱ्याच्या आसपास सुरू होणार असल्याने मजुरांची ऊसतोडीसाठी जाण्याची लगबग वाढली आहे. कमी कामाच्या कालावधीमुळे ऊसतोड मजुरांच्या उत्पन्नावर परिणाम होण्याची चिंता व्यक्त होत आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here