छत्रपती संभाजीनगर : थकीत ऊस बिलासाठी पैठण शहरात शेतकरी संघटनेचे भीक मांगो आंदोलन

छत्रपती संभाजीनगर : सचिन घायाळ शुगर प्रा. लि. संचलित श्री संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याकडे ऊस घातलेल्या शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे बिल थकीत असल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी सोमवारी पैठण शहरात भीक मांगो आंदोलन केले. यापूर्वीही ऊस बिलाच्या थकबाकीबाबत प्रादेशिक सहसंचालक कार्यालय, छत्रपती संभाजीनगर, तहसीलदार कार्यालय तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अनेक वेळा निवेदने देण्यात आली. मात्र, वारंवार पाठपुरावा आणि आंदोलने करूनही शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप एक रुपयाही जमा झालेला नसल्याचा आरोप संघटनेने केला.

भीक मांगो आंदोलनादरम्यान शासन व प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आमच्या घामाचे पैसे मिळत नसतील तर सरकारला भीक मागण्याची वेळ आमच्यावर का यावी? असा सवाल उपस्थित करत आंदोलनकर्त्यांनी नागरिकांकडून सरकारच्या नावाने भीक मागितली. आंदोलनादरम्यान जमा झालेली रक्कम जिल्हाधिकारी, छत्रपती संभाजीनगर यांना सुपूर्द करण्यात येणार असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माऊली मुळे, विष्णू बोडखे, दिलीपराव नरके, संतोष तांबे, पवन शिसोदे, एकनाथ दसपुते, विनोद औटे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. निवेदने देऊनही प्रशासनाकडून केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. कारखान्याविरोधात कठोर कारवाई करून थकीत ऊस बिल तातडीने अदा करावे, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनासह व्यापक लढा उभारण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here