छत्रपती संभाजीनगर : जय हिंद शुगरने गाळप केलेल्या उसाची १५ दिवसांत बिले देणार – चेअरमन डोणगावकर यांचे आश्वासन

छत्रपती संभाजीनगर : चालू गळीत हंगामात ‘जय हिंद’ने गाळप केलेल्या उसाची बिले १५ दिवसांत देण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे आश्वासन कारखान्याचे चेअरमन कृष्णा पाटील डोणगावकर यांनी दिले. गंगापूर कारखान्याची ४५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष कृष्णा पाटील डोणगावकर यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (ता. १७) रोजी झाली. यावेळी ते बोलत होते. सभेत सभासदांच्या मागणीनंतर ‘जय हिंद’चे प्रतिनिधी विठ्ठल कुंजर यांनी दोन दिवसांत शेतकऱ्यांचे २२ लाख रुपये आणि कामगारांचे दोन कोटी रुपये ३० तारखेपर्यंत देण्याचे मान्य केले. विविध माध्यमातून निधीची उभारणी करून गंगापूर सहकारी साखर कारखाना लवकरच पूर्णपणे कर्जमुक्त केला जाईल, अशी ग्वाही चेअरमन पाटील यांनी दिली.

सभेत माजी अध्यक्ष कैलास पाटील यांनी राज्य बँकेच्या ४८ कोटींच्या थकबाकीबाबत विचारणा केली. हा कारखाना संस्थेने स्वतः चालवावा, अशी मागणी सभासदांनी केली. यावर कारखाना कर्जमुक्त करण्यासाठी विविध मार्गांनी निधी उभारण्यात येईल. आतापर्यंत ३ कोटी ७ लाख रुपये भरले आहेत. जय हिंद शुगरकडील थकबाकीवर १८ टक्के व्याज सुरू आहे. असे चेअरमन डोणगावकर यांनी सांगितले. यावेळी उपाध्यक्ष आप्पासाहेब गावंडे यांच्यासह संचालक दादा जगताप, इंद्रजित डोणगावकर, शेषराव साळुंके, सुभाषराजे भोसले, रामनाथ पाटील, अण्णासाहेब शिंदे, कारभारी गायके, नामदेव दारूटे, बाबूलाल शेख, प्रभारी कार्यकारी संचालक नंदू परदेशी यांच्यासह सभासद उपस्थित होते. आप्पासाहेब गावंडे यांनी आभार मानले.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here