छत्रपती संभाजीनगर : पावसासोबत वीजही गायब, ऊस पिक वाळल्याने कन्नड तालु्क्यात शेतकरी चिंतेत

छत्रपती संभाजीनगर : गेल्या वर्षी मे महिन्यापासूनच अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे यंदाही पाऊस वेळेत पडेल, या आशेवर अनेक शेतक-यांनी मजुरांच्या वाढत्या टंचाई व खर्चापासून बचाव करण्यासाठी मर्यादित पाण्यावर आणि हवामान अंदाजाच्या आधारे उसाची लागवड केली. मात्र मृग नक्षत्र संपण्याच्या उंबरठ्यावर आला तरीही समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे कन्नड तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. पाऊस पडत नसल्याने आणि सौरऊर्जा प्रकल्प सुरू झाल्यापासून वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने उसाला पाणी देणे अशक्य बनले आहे. अनेक ठिकाणी हिरवागार ऊस पिवळा पडून वाळत आहे. किमान वीज पुरवठा सुरू ठेवण्याची मागणी केली जात आहे.

शेतीला केवळ पाच ते सहा तासच वीज दिली जात आहे. काही भागांमध्ये विहिरींची पाणीपातळी घटल्याने सिंचनावर आणखी परिणाम झाला आहे. परिणामी, उसाची वाढ खुंटत असून पिके वाळण्याच्या मार्गावर आहेत. हतनूर महावितरण उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या टापरगाव, जैतापूर आदी फीडरवरील वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. अनेकदा फक्त पाच तास वीजपुरवठा केला जातो. लांबलेला पाऊस आणि विस्कळीत वीजपुरवठा यामुळे शेतकरी अक्षरशः वैतागले असून पाऊस येईपर्यंत तरी अखंड आणि पुरेसा वीजपुरवठा करावा, अशी मागणी होत आहे. हतनूर, टापरगाव परिसरात शिवना टाकळी मध्यम प्रकल्पामुळे बागायती क्षेत्र जास्त आहे. मात्र शेतकऱ्यांना सुरळीत वीज पुरवठा करण्यात येत नसल्याने ते संकटात सापडले असून पाऊस लांबल्याने धूळ पेरणी केलेल्या पिकांना व उसाला पाण्याची गरज असून अखंडित वीज पुरवठा करण्यात यावा अशी मागणी हतनूरच्या प्रगतशील शेतकरी तथा तंटामुक्त समितीचे अध्यक्ष गंगाधर मोहिते यांनी केली आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here