छत्रपती संभाजीनगर : उसाला प्रतिटन ३ हजार ५०० रुपये पहिली उचल मिळावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे. या मागणीसाठी चौंढाळा येथील श्री रेणुकादेवी शरद सहकारी साखर कारखाना प्रशासन आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्यात जोरदार वादावाजी झाली. त्यानंतर स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी सकाळी अकराला कारखाना परिसरात आंदोलन केले. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी थेट गव्हाणीत उतरून गाळप बंद पाडले. त्यानंतर तणाव वाढल्याने कारखाना प्रशासनानेही गाळप बंद करण्याचा निर्णय घेतला. २४ ऑक्टोबरला कार्यक्षेत्रातील नवगाव शिवारात सुमारे शंभर एकर ऊस जळून खाक झाला होता. हा जळीत ऊस तातडीने गाळप करणे शेतकऱ्यांच्या हिताचे होते. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान टाळण्यासाठीच चेअरमन व संचालक मंडळाने गाळप सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला होता, असे कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक नामदेव बावडकर यांनी स्पष्ट केले.
आंदोलनाबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माऊली मुळे म्हणाले की, आम्ही २७ ऑक्टोबरला कारखान्याला निवेदन देऊन १ नोव्हेंबरपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास २ तारखेला आंदोलनाचा स्पष्ट इशारा दिला होता. असे असतानाही प्रशासनाने कारखाना सुरू का ठेवला आणि शेतकऱ्यांना अडचणीत का आणले ? असा सवाल त्यांनी केला. याबाबत कारखान्याचे व्हाइस चेअरमन नंदू पठाडे म्हणाले की, कारखाना कार्यक्षेत्रातील पाणीटंचाईग्रस्त गावांचा ऊस प्राधान्याने गाळपास आणण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. पाण्याअभावी वाळत चाललेला ७ ते ८ महिन्यांचा अपरिपक्व ऊस सध्या येत असून त्याचा साखर उतारा अत्यंत कमी आहे. त्यामुळे सध्याच्या स्थितीत आंदोलकांच्या मागणीप्रमाणे दर देणे आर्थिकदृष्ट्या शक्य नाही. शेतकरी संघटनेच्या आडमुठ्या भूमिकेमुळे उसाचे नुकसान झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी त्यांचीच राहील.


















