छत्रपती संभाजीनगर : ऊसतोड मजुरांचा टेम्पो दरीत कोसळला, गौताळा घाटातील अपघातात १३ जण जखमी

छत्रपती संभाजीनगर : सोयगाव तालुक्यातील दस्तापूर येथील ऊसतोड मुकादम सुखदेव आनंदा पगारे यांच्या टोळीतील मजूर गेल्या साडेतीन-चार महिन्यांपासून बारामती परिसरात ऊसतोडीसाठी गेले होते. हंगाम संपल्याने सर्व मजूर आयशर टेम्पो (क्रमांक एम.एच. २१ बी.एच. ०४४२) ने आपल्या गावी निघाले होते. गौताळा घाटातील अवघड वळणावर गाडीचे ब्रेक अचानक फेल झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पो दरीत उलटला. ही घटना रविवारी सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास घडली. अपघातात सोयगाव तालुक्यातील दस्तापूर येथील १३ मजूर जखमी झाले असून, त्यापैकी ७ जणांची प्रकृती गंभीर आहे. कन्नड ग्रामीण पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद झाली असून बीट जमादार रवींद्र ठाकूर व प्रदीप पवार तपास करत आहेत.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, बारामती येथील साखर कारखान्याचा हंगाम संपवून आपल्या मूळ गावी परतणाऱ्या ऊसतोड मजुरांच्या आयशर टेम्पोला गौताळा घाटात भीषण अपघात झाला. घाटातील म्हसोबा मंदिरा जवळील वळणावर टेम्पोचे ब्रेक अचानक फेल झाल्याने गाडी दरीत उलटली. अपघाताचा आवाज ऐकताच सायगव्हाण आणि भिलदरी तांडा येथील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. गावकऱ्यांनी प्रसंगावधान राखत गाडीखाली अडकलेल्या मजुरांना बाहेर काढले आणि रुग्णवाहिकेची वाट न पाहता मदत कार्य सुरू केले. जखमींना तातडीने कन्नड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. गंभीर जखमी वंदना अंभोरे, रुक्सना तडवी, दिव्या पगारे, सोमीबाई तडवी, रंजनाबाई पगारे, मनीषा वाघ आणि ममता वाघ या सात जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here