पुणे : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चालू गळीत हंगामातील पहिल्या ऊस उचलीवरून शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. शेतकरी कृती समितीने प्रतिटन ३,९०० रुपये पहिला हप्ता देण्याची मागणी केली असून, २५ नोव्हेंबरपर्यंत निर्णय न झाल्यास काटाबंद आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. दुसरीकडे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने प्रतिटन ४,२०० रुपये पहिली उचल देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे सोमेश्वर कारखान्याच्या ऊसदराचा प्रश्न ऐरणीवर आला असून, आगामी काळात संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे.
२५ नोव्हेंबरपर्यंत निर्णय घ्या, अन्यथा काटाबंद आंदोलन!
शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष सतीश काकडे यांनी कारखान्याच्या संचालक मंडळाने तातडीने बैठक घेऊन सभासद ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन ३,९०० रुपये पहिला हप्ता जाहीर करावा, अशी मागणी केली आहे.सोमेश्वर कारखाना १५ ऑक्टोबरपासून सुरू झाला असून, आतापर्यंत ३ लाख १ हजार टन उसाचे गाळप झाले आहे. त्यातून ३ लाख ३५ हजार साखर पोत्यांचे उत्पादन झाले असून, साखरेचा उतारा ११.१४ टक्के आहे. कारखान्याची आर्थिक आणि उत्पादनाची परिस्थिती समाधानकारक असल्याने पहिली उचल जाहीर करण्यास विलंब करण्याचे कारण नाही, असे काकडे यांनी स्पष्ट केले.
ऊस गाळप झाल्यानंतर १४ दिवसांच्या आत ऊसबिल देणे कायद्याने बंधनकारक आहे. मुदतीत बिल अदा न केल्यास १५ टक्के व्याज देण्याची तरतूद आहे. असे असतानाही कारखान्याला आर्थिक जुळवाजुळव करण्यासाठी समितीने २५ नोव्हेंबरपर्यंत मुदत दिली आहे. या मुदतीत प्रतिटन ३,९०० रुपयांच्या पहिल्या हप्त्याचा निर्णय न झाल्यास काटाबंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा काकडे यांनी दिला. तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी संचालक मंडळाला पहिली उचल जाहीर करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणीही समितीने केली आहे.
शिवसेना ठाकरे गटाची ४,२०० रुपयांची मागणी
दरम्यान, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे बारामती तालुकाप्रमुख हनुमंत भापकर यांनी कारखाना प्रशासनाला निवेदन देत प्रतिटन ४,२०० रुपये पहिली उचल देण्याची मागणी केली आहे.कारखान्याचे ऊस गाळप, साखरेचा उतारा, साखरेचे बाजारभाव आणि उपपदार्थांपासून मिळणारे उत्पन्न विचारात घेता शेतकऱ्यांना अधिकचा दर देणे शक्य असल्याचे भापकर यांनी म्हटले आहे. दुसरीकडे, खत, औषधे, मजुरी, मशागत आणि वाहतूक खर्चात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या परवडणारा दर मिळणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
ऊसदराच्या निर्णयाकडे शेतकऱ्यांचे लक्ष
एकीकडे शेतकरी कृती समितीची ३,९०० रुपयांची मागणी, तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाची ४,२०० रुपयांची मागणी यामुळे सोमेश्वर कारखान्याच्या पहिल्या उचलीचा मुद्दा चांगलाच तापला आहे. आता कारखान्याचे संचालक मंडळ कोणता निर्णय घेणार आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना किती पहिली उचल मिळणार, याकडे संपूर्ण परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.


















