गाळप हंगाम २०२६ – २७ : महाराष्ट्रात आतापर्यंत ५५ कारखाने झाले सुरु, उद्यापासून गाळप हंगामाला येणार गती

पुणे : राज्यात १३ ऑक्टोबरपर्यंत ५५ साखर कारखान्यांनी गाळप हंगाम सुरु केल्याची माहिती महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना महासंघातर्फे देण्यात आली आहे. राज्य सरकारने १५ ऑक्टोबरपासून गाळप हंगाम सुरु करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे उद्यापासून गाळप हंगामाला वेग येण्याची शक्यता आहे. सध्या सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वात जास्त प्रत्येकी ११ कारखाने सुरु झाले आहेत. त्यापाठोपाठ पुणे आणि सातारा जिल्ह्यात प्रत्येकी ८ कारखाने सुरु झाले आहेत. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात अनुक्रमे ३ आणि ४ कारखाने सुरु झाले आहेत.

यंदाच्या गाळप हंगामावर दुष्काळाचे सावट

ChiniMandi WhatsApp Channel

यंदा हंगामावर दुष्काळाचे सावट असल्याने साखर कारखान्यांसमोर पुरेसा ऊस उपलब्ध करण्याचे मोठे आव्हान आहे. त्यामुळे ऊस मिळविण्यासाठी कारखान्यांमध्ये चढाओढ होण्याची चिन्हे दिसत आहेत. राज्यातील काही भागांत उसाची अपेक्षित वाढ झालेली नसल्याने उपलब्ध उसाचे क्षेत्र आणि प्रत्यक्ष गाळपासाठी मिळणारे ऊसाचे प्रमाण याबाबत कारखाना व्यवस्थापनाकडून नियोजन केले जात आहे. उसाच्या वजनातही मोठी घट होण्याची शक्यता आहे.

पुरेसा ऊस मिळविण्यासाठी कारखान्यांची धडपड

यंदा उसाची उपलब्धता मर्यादित राहण्याची शक्यता लक्षात घेता कारखान्यांमध्ये ऊस मिळविण्यासाठी स्पर्धा वाढण्याची शक्यता आहे. गाळप क्षमता मोठी असलेल्या कारखान्यांना ती पूर्ण क्षमतेने वापरण्यासाठी सातत्याने ऊस पुरवठा होणे आवश्यक आहे. मात्र, उपलब्ध ऊस अपेक्षेपेक्षा कमी राहिल्यास गाळपाचे उद्दिष्ट साध्य करताना अडचणी निर्माण होऊ शकतात.या साठी कारखाने ऊसतोडणी टोळ्या, ट्रॅक्टर, ट्रक, बैलगाड्या आणि हार्वेस्टर यंत्रणांच्या उपलब्धतेवर भर देत आहेत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी संपर्क ठेवणे, तोडणीचे वेळापत्रक निश्चित करणे आणि वाहतुकीतील अडथळे दूर करणे याला यंदा विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. कार्यक्षेत्रातील उसाबरोबरच आवश्यकतेनुसार बाहेरील क्षेत्रातील उसासाठीही काही कारखान्यांनी ‘फिल्डिंग’ लावली आहे.

ऊसतोडणीसाठी २,७२० हार्वेस्टर सज्ज

राज्यात ऊसतोडणीसाठी यांत्रिकीकरणाला प्राधान्य दिले जात असून, यंदाच्या गळीत हंगामासाठी २,७२० हार्वेस्टर उपलब्ध झाले आहेत. यापैकी ३२१ हार्वेस्टर साखर कारखान्यांच्या मालकीचे आहेत, तर २,३९९ हार्वेस्टर कारखान्यांनी करारावर घेतले आहेत. या यंत्रांच्या मदतीने सुमारे दोन लाख १५ हजार २०४ हेक्टर क्षेत्रावरील ऊसतोडणी होण्याची शक्यता असल्याचे दैनिक अॅग्रोवनमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीत म्हटले आहे. मजुरांची कमतरता, वेळेत ऊसतोडणी पूर्ण करण्याची गरज आणि गाळपाचे योग्य नियोजन यामुळे साखर कारखाने हार्वेस्टरच्या वापरावर भर देत आहेत.

पश्चिम महाराष्ट्रात ऊसदर आंदोलन तीव्र

पश्चिम महाराष्ट्रात ऊसदराच्या मागणीवरून शेतकरी आंदोलन तीव्र झाले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली मंगळवारी सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांत विविध ठिकाणी रास्ता रोको आणि ऊस वाहतूक रोखण्याची आंदोलने करण्यात आली. उसाला प्रतिटन ५,५०० रुपये दर मिळावा, या मागणीसाठी आंदोलकांनी महामार्गांवर ठिय्या देत साखर कारखानदारांचे लक्ष वेधले. पुणे-सोलापूर महामार्गावर तीन तास रास्ता रोको करण्यात आला. सांगलीत १५० हून अधिक ट्रॅक्टर रोखले तर साताऱ्यात ऊस वाहतूक बंद पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला. यंदाच्या गाळप हंगामावर दुष्काळाचे संकट आणि ऊसदर आंदोलनाचे सावट पाहायला मिळत आहे.

गाळप हंगामाबाबत ‘चीनीमंडी’शी बोलताना राज्याचे साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी सांगितले कि, साखर कारखान्यांना गाळप हंगामाची परवानगी देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. राज्यात गाळप हंगाम सुरळीत पार पडावा यासाठी योग्य समन्वय ठेवला जात आहे. उद्यापासून (15 ऑक्टोबर) गाळप हंगामाला गती मिळण्याची शक्यता आहे.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here