सोलापूर : ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बिले मागील वर्षाप्रमाणे एकरकमी आणि वेळेत अदा करण्यात येणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही भूलथापांना बळी न पडता आपला संपूर्ण ऊस वृंदावन शुगर कारखान्याला गाळपासाठी द्यावा, असे आवाहन कारखान्याचे चेअरमन लक्ष्मण कदम यांनी केले. बार्शी तालुक्यातील उपळाई (ठों) येथील वृंदावन शुगर अॅन्ड अलाईड प्रॉडक्ट्स एलएलपी या साखर कारखान्याच्या सन २०२६-२७ या गळीत हंगामाच्या बॉयलर अग्निप्रदीपन आणि गव्हाणीत मोळी टाकण्याच्या कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कारखान्याचे व्हाइस चेअरमन अनिल कदम, ठाणे येथील उद्योजक इंद्रजीत निंबाळकर, चार्टर्ड अकाउंटंट परकाळे आणि रितेश काळे उपस्थित होते.
कारखान्याने ३० टन क्षमतेचा स्वतःचा वजनकाटा उपलब्ध करून ठेवला आहे. वजनकाट्याबाबत कोणत्याही शेतकऱ्याला शंका असल्यास त्यांनी या काट्यावर आपल्या उसाचे वजन करून प्रत्यक्ष खात्री करावी, असे कारखान्याच्या वतीने सांगण्यात आले.तसेच, शेतकरी किंवा वाहनमालकांना आपल्या वाहनातील उसाचे वजन बाहेरील वजनकाट्यावर करून घेता येईल. त्यानंतर कारखान्याच्या वजनकाट्यावर पुन्हा वजन करून दोन्ही वजनांची तुलना करता येईल. यामुळे वजनकाट्याची अचूकता तपासण्याची संधी उपलब्ध होणार असल्याचे कारखाना प्रशासनाने स्पष्ट केले.
या कार्यक्रमाला कारखान्याचे केन मॅनेजर अजमेर कारभारी, वर्क्स मॅनेजर सखाराम तौर, इम्रान कोतवाल, मुख्य रसायनशास्त्रज्ञ सुधीर काशिद, डिस्टिलरी मॅनेजर सर्फराज कोतवाल, फायनान्स मॅनेजर सुधीर जगदाळे, मुख्य लेखापाल कुलदीप करळे, अरुण बागनवर आणि कार्यालय अधीक्षक सिद्धाराम मुलगे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.


















