अहिल्यानगरमध्ये ऊसदराचा तिढा सुटला! प्रतिटन ३,४५० रुपयांचा दर निश्चित; शेतकरी संघटनांचे आंदोलन स्थगित

अहिल्यानगर : गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या ऊसदराच्या संघर्षाला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ऊसाला प्रतिटन ३ हजार ४५० रुपये दर देण्यावर सहमती झाली. या निर्णयानंतर राजू शेट्टी यांनी २८ नोव्हेंबरपासून जिल्ह्यात सुरू असलेले आंदोलन स्थगित करण्याची घोषणा केली.

निश्चित करण्यात आलेल्या दरानुसार शेतकऱ्यांना पहिली उचल म्हणून प्रतिटन ३ हजार २५० रुपये मिळणार आहेत. त्यानंतर मार्च महिन्यात आणखी १०० रुपये, तर गळीत हंगामाच्या अखेरीस साखरेचे बाजारभाव अनुकूल राहिल्यास अतिरिक्त १०० रुपये दिले जाणार आहेत. अशा प्रकारे शेतकऱ्यांना एकूण प्रतिटन ३ हजार ४५० रुपये मिळणार आहेत.

ChiniMandi WhatsApp Channel

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, प्रादेशिक सहसंचालक गणेश पुरी, माजी आमदार भानुदास मुरकुटे, राजेंद्र नागवडे यांच्यासह विविध साखर कारखान्यांचे प्रतिनिधी आणि शेतकरी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

चार हजारांच्या मागणीवरून सुरू झाला होता संघर्ष

गळीत हंगाम सुरू झाल्यानंतर ऊसदराचा प्रश्न चांगलाच तापला होता. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने प्रतिटन चार हजार रुपये दर आणि किमान ३ हजार ७०० रुपयांची पहिली उचल देण्याची मागणी केली होती. मात्र, गाळप सुरू होऊन दीड महिना उलटूनही कारखानदारांकडून दर जाहीर होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढत होती.

या पार्श्वभूमीवर विविध शेतकरी संघटनांनी आंदोलने सुरू केली. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तोडगा काढण्यासाठी दोन वेळा प्रयत्न केले; मात्र त्यांना यश आले नाही. अखेर राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी दोन दिवसांत बैठक घेण्याचे आश्वासन देत ऊसतोड बंद ठेवण्याचे निर्देश दिले.

चार तासांच्या चर्चेनंतर तोडगा

शुक्रवारी (ता. २७) पालकमंत्री विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तिसरी बैठक पार पडली. या बैठकीत राजू शेट्टी यांनी इतर जिल्ह्यांमध्ये झालेल्या निर्णयाप्रमाणेच अहिल्यानगरमधील शेतकऱ्यांना ऊसदर मिळावा, अशी ठाम भूमिका मांडली.यावर विखे-पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार साखर कारखाने लवकर सुरू करण्यात आल्याने जिल्ह्यातील कारखान्यांचा साखर उतारा घटल्याचे सांगितले. त्यामुळे कारखान्यांची आर्थिक परिस्थिती अडचणीत आली असून, शेतकऱ्यांना एफआरपी देणेही कठीण होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यानंतर कारखानदार आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. काही संघटनांच्या प्रतिनिधींना सुरुवातीच्या चर्चेत सहभागी करून न घेतल्याने वाद निर्माण झाला. त्यानंतर त्यांनाही चर्चेत सहभागी करून घेण्यात आले. अखेर सुमारे चार तासांच्या चर्चेनंतर सर्वानुमते प्रतिटन ३ हजार ४५० रुपये दर निश्चित करण्यात आला.

विशेष म्हणजे, यापूर्वी ज्या कारखान्यांनी यापेक्षा कमी दराने ऊस बिल अदा केले आहे, त्यांनी उर्वरित फरकाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, असे निर्देश देण्यात आले. हा दर अंतिम किंवा कमाल मर्यादा नसून कारखानदारांसाठी किमान दराची मर्यादा आहे. त्यामुळे इच्छुक कारखाने यापेक्षा अधिक दर देऊ शकतात.

साखरेचे दर वाढल्यास शेतकऱ्यांनाही फायदा द्या : राजू शेट्टी

साखर आणि उपपदार्थांच्या विक्रीतून साखर कारखान्यांना चांगले उत्पन्न मिळते. या उत्पन्नातील ७० टक्के फायदा कायद्यानुसार शेतकऱ्यांना मिळायला हवा, अशी भूमिका राजू शेट्टी यांनी मांडली.आगामी काळात साखरेच्या बाजारभावात वाढ होण्याची शक्यता असून, हंगामाच्या अखेरीस साखरेचे दर प्रतिक्विंटल ६ हजार ते ६ हजार ५०० रुपयांपर्यंत पोहोचू शकतात. त्यामुळे साखरेचे दर वाढल्यास त्याचा आर्थिक लाभ शेतकऱ्यांनाही मिळाला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

कारखानदारांना अधिक दर देण्याची मुभा

बैठकीनंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले की, शेतकरी आणि कारखानदार यांनी एकत्र बसून चर्चेतून मार्ग काढावा, हीच आमची भूमिका होती. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दर कसा देता येईल, यावर बैठकीत भर देण्यात आला. त्याचबरोबर कारखान्यांच्या आर्थिक परिस्थितीचाही विचार करण्यात आला. मध्यस्थीच्या माध्यमातून तोडगा काढण्यात आला असून, अधिक दर देण्याची इच्छा असलेल्या कारखान्यांना त्याची मुभा आहे.

३,४५० रुपये ही किमान लक्ष्मणरेषा : राजू शेट्टी

राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले की, प्रतिटन ३ हजार ४५० रुपये हा अंतिम किंवा कमाल दर नाही, तर कारखानदारांसाठी निश्चित केलेली किमान लक्ष्मणरेषा आहे. शेजारील जिल्ह्यांतील काही कारखाने प्रतिटन ३ हजार ५०० ते ३ हजार ७०० रुपये दर देत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या उसाला सर्वाधिक दर देणाऱ्या कारखान्याला ऊस देण्याचा निर्णय घ्यावा.

या निर्णयामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील ऊसदराचा प्रश्न तूर्तास मार्गी लागला असून, आंदोलन स्थगित झाल्याने साखर कारखान्यांच्या गाळप प्रक्रियेलाही दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here