धाराशिव : गेल्या वर्षी जिल्ह्यात अतिपाऊस झाल्याने २५ हजार हेक्टरवर नव्याने लागवड झाली. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण क्षेत्र ७९ हजार हेक्टरवर गेले होते. मात्र, यंदा पावसात मोठा खंड पडल्याने १८ हजार हेक्टरवरील उसाची वाढ पूर्णपणे थांबली आहे. हा ऊस गाळपासाठी योग्य उरलेला नाही. ज्या उसाचे गाळप होणार आहे, त्याचीही कांड्यांची संख्या आणि वजन कमी भरत असल्याने वजनात मोठी घट येणार आहे. तसेच पाण्याचा ताण बसल्याने साखरेचा उतारादेखील घटण्याचा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे यंदा ६० हजार हेक्टर ऊस उपलब्ध असूनही एकूण ऊस गाळप आणि साखर उत्पादनात २० ते २५ टक्क्यांची घट होण्याचा अंदाज साखर क्षेत्रातील तज्ज्ञांनी वर्तवला आहे. जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयातील तंत्र अधिकारी प्रवीण चोपडे यांच्या मते गेल्या वर्षी गाळपायोग्य उसाचे ५४ हजार हेक्टर क्षेत्र होते. अतिपाऊस झाल्याने २५ हजार हेक्टर उसाची नव्याने लागवड वाढून एकूण क्षेत्र ७९ हजार हेक्टरवर गेले. यंदा अत्यल्प पाऊस आणि त्यात मोठा खंड पडल्याने १८ हजार हेक्टरवरील उसाची वाढ पूर्णपणे थांबली आहे असे स्पष्ट केले.
मागील वर्षी सर्व १४ कारखाने एप्रिलअखेरपर्यंत सुरू राहिले. त्यामुळे जिल्ह्यात ६१ लाख टन ऊस गााळपाचा टप्पा पार झाला होता. परंतु, यंदा उसाचे वजन घटल्यामुळे हा हंगाम दीड ते दोन महिने आधीच, म्हणजेच फेब्रुवारी अखेरपर्यंतच आटोपेल, असा अंदाज कारखानदारांनी व्यक्त केला आहे. याबाबत कळंब तालुक्यातील माळकरंजा येथील शेतकरी बाळासाहेब पाटील यांनी सांगितले की, माझा नऊ एकर ऊस आहे. मागील वर्षी त्यात ६३८ टन उत्पादन मिळाले होते. यंदा ते ५०० टनांच्या आताच राहील. कारण, मागील वर्षी ऊस ३२ ते ३३ कांड्यांवर होता. यंदा तो २० ते २२ कांड्यांवर आहे. अपेक्षित वाढ झालेली नाही. त्यामुळे उत्पादन घटणार आहे. रांजणीच्या नॅचरल शुगरचे संचालक पांडुरंग आव्हाड यांनी यंदा पावसाअभावी उसाची वाढ झालेली नाही. त्यामुळे निश्चितपणे वजन घटून अॅव्हरेज कमी येणार आहे. त्यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत साखर उत्पादन २० टक्क्यांनी कमी होईल असे दिसते अशी शक्यता व्यक्त केली.


















