धाराशिव : बाणगंगा सहकारी साखर कारखान्याच्या नव्या व्यवस्थापनाने ५ ऑगस्टपर्यंत सर्व थकीत ऊसबिले व वाहतूक देयके अदा करण्यात येतील, असे लेखी आश्वासन दिले. त्यांच्या या आश्वासनानंतर ऊस उत्पादक शेतकरी व ऊस तोडणी वाहतूक ठेकेदारांची थकीत बिले तातडीने अदा करण्यात यावीत, या प्रमुख मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते गणेश भीमराव अंधारे (महाराज) यांनी २१ जुलैपासून सुरू केलेले बेमुदत उपोषण चौथ्या दिवशी मागे घेतले. अनेक वेळा चर्चा झाल्यानंतर कारखान्याच्या व्यवस्थापनाने लेखी पत्र देत थकीत देयके निश्चित मुदतीत अदा करण्याची ग्वाही दिली.
याबाबत कारखान्याच्या व्यवस्थापनाने असे स्पष्ट केले आहे की, आयान मल्टिट्रेड एलएलपी या कंपनीने बाणगंगा सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर चालविला होता. मात्र, ५ जून रोजी कायदेशीर प्रक्रियेनुसार नोंदणीकृत कारखान्याचे सर्व हक्क, अधिकार, मालकी आणि दायित्वे राजगंगा शुगर अॅण्ड अलाइड प्रॉडक्ट एलएलपी या नव्या कंपनीकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. त्यामुळे आता नव्या व्यवस्थापनाकडून ही ऊस बिले दिली जातील. दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते गणेश अंधारे यांच्या उपोषणाला शेतकरी, ऊस तोडणी-वाहतूक ठेकेदार आणि विविध शेतकरी संघटनांनी पाठिंबा दिला होता.


















