धाराशिव : खरीप हंगाम तोंडावर असतानाही थकीत ऊस बिले न मिळाल्याने भूम व परंडा तालुक्यातील शेतकऱ्यांनी ईडा (अंतरगाव) येथील बाणगंगा साखर कारखान्यासमोर गुरुवारी (ता. २) ठिय्या आंदोलन केले. बियाणे, खते, औषधे मशागतीसाठी पैशांची निकड असताना ऊस बिले रखडल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करीत व्यवस्थापनाला धारेवर धरले. आंदोलकांच्या आक्रमक भूमिकेनंतर कारखाना व्यवस्थापनाने २० जुलैपर्यंत सर्व थकीत ऊस बिले अदा करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
शेतकऱ्यांच्या घामाचे पैसे वेळेवर मिळाले नाहीत, तर शेतीची कामे कशी करायची? असा सवाल उपस्थित करत शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. दिलेल्या मुदतीत बिले न मिळाल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला. आंदोलनात माणकेश्वर, भांडगाव, अंतरगाव, लाखी, तांबेवाडी, जवळा (नि.), ब्रह्मगाव आदी गावांतील ऊस उत्पादकांसह गणेश अंधारे, भाऊसाहेब दोपाटे, लालासाहेब अंधारे, विशाल वीर, प्रताप पाटील, अविनाश मुळे, संतोष जामदार, फकीर कुरेशी, अथर्व अंधारे, महावीर गायकवाड, हरिदास डुकरे आदींनी सहभाग नोंदवला.


















