धाराशिव : बाणगंगा साखर कारखान्याला (आयन मल्टी ट्रेड एलएलपी) ऊस पुरवून सहा ते सात महिने उलटले, तरी बिलांची रक्कम खात्यात जमा झालेली नाही. काही शेतकऱ्यांची बिले तर वर्षभरापासून प्रलंबित असल्याने शेतकरी तीव्र आर्थिक अडचणीत सापडले आहेत. यापूर्वी २ जुलै रोजी शेतकऱ्यांनी कारखान्याच्या प्रवेशद्वारावर आंदोलन केले होते. त्यावेळी प्रशासनाने २० जुलैपूर्वी सर्व थकीत बिले देण्याचे लेखी आश्वासन दिले होते. मात्र, या मुदतीत पैसे जमा न झाल्यास २१ जुलैपासून थेट उपोषण सुरू करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
साखर आयुक्त आणि कारखाना प्रशासनाला कामगारांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांची थकीत बिले अद्याप न मिळाल्याने शेतकऱ्यांनी २१ जुलैपासून कारखाना परिसरात अन्नत्याग उपोषणाचा इशारा दिला आहे. आंदोलनात शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून गणेश अंधारे महाराज अन्नत्याग उपोषण करणार असून, इतर शेतकरी साखळी उपोषणात सहभागी होतील. थकीत बिले असलेले वाहनधारकही यात सहभागी होणार आहेत. लवकरात लवकर तोडगा काढावा आणि ऊस बिले द्यावीत, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.


















