धाराशिव : उमरगा तालुक्यातील भाऊसाहेब बिराजदार सहकारी साखर कारखान्याच्या थकीत ऊस बिलप्रश्नी औसा तालुक्यातील एकंबी येथील दोन शेतकऱ्यांनी शुक्रवारी थेट जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराच्या कमानीवर चढून ‘शोलेस्टाइल’ आंदोलन केले. संचालक मंडळाने तात्काळ येऊन लेखी आश्वासन न दिल्यास खाली उड्या टाकण्याचा इशारा हातात लाऊड स्पीकर घेऊन शेतकरी देत होते. तब्बल सात तास हे आंदोलन चालले. अखेर कारखान्याने १० सप्टेंबरपर्यंत ऊस बिल अदा करण्याचे कळविले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावे, असे लेखी पत्र निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर यांनी शेतकऱ्यांना दिले. त्यामुळे कमानीवर चढून बसलेले प्रधुम्न सुर्यवंशी, भागवत सगर खाली उतरले. दहा तारखेस बिलन मिळाल्यास शेकडो शेतकऱ्यांसह तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला.
सकाळी ११ वाजता प्रद्युम्न सूर्यवंशी व भागवत सगर या शेतकऱ्यांनी कमानीवर चढून गेल्या ८ महिन्यांपासून हक्काची ऊस बिले न दिल्याचा आरोप केला. यापूर्वी वारंवार आंदोलने, मोर्चे व उपोषण करूनही कारखाना दुर्लक्ष करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. ‘रात्रंदिवस कष्ट करून कारखान्याला ऊस दिला, तरी ८ महिने पैसे मिळत नाहीत. घरखर्च, मुलांचे शिक्षण अन् कर्जाचे हप्ते कसे भरायचे?’ असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी केला. आंदोलनाला गुरुनाथ आवटे, बालाजी मानधने, गणपती सूर्यवंशी आदी शेतकऱ्यांनी उपस्थित राहून पाठिंबा दर्शवला. त्यानंतर आनंदनगर पोलिस, अग्निशमन व आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी दिवसभर आंदोलनस्थळी तळ ठोकून होते. कारखान्याचे जनरल मॅनेजर बी. जे. पाटील यांनी सांगितले की, दोन महिन्यांपूर्वी कंपनी बदलली आहे. नवीन कंपनीशी करार व परवान्यासाठी वेळ लागला. मागील महिन्यापासून बिले जमा करण्यास सुरुवात झाले आहे. उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर १० सप्टेंबरपर्यंत बिले जमा केले जाणार आहेत.


















