धुळे:शेतकऱ्यानी गळीत हंगाम २०२५-२६ मध्ये आपला ऊस एस. जे. शुगर (रावळगाव) कारखान्याला पाठवला होता. अनेक शेतकऱ्यांची गेल्या पाच महिन्यांपासून उसाची बिले थकीत आहे. याबाबत कारखाना प्रशासन आणि शासकीय अधिकाऱ्यांना वारंवार निवेदने देऊनही कोणतीही दखल न घेतल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. पैसे मिळत नसल्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्याने तहसील कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. सुदैवाने, घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप केला. थकीत ऊस बिल मिळावे, यासाठी शेतकऱ्यांनी धनंजय अहिरराव यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले.
आंदोलनानंतर शेतकऱ्यांनी कारखान्याला नवी डेडलाइन दिली. जर ३० एप्रिल २०२६ पर्यंत संबंधित कारखान्याने २९०० रुपये प्रति टन प्रमाणे थकीत बिले अदा केली नाहीत, तर सर्व शेतकरी बेमुदत उपोषणाला बसतील, असा इशारा देण्यात आला. धनंजय अहिरराव यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. ते म्हणाले की, शासनाच्या नियमानुसार, ऊस तुटल्यानंतर १४ दिवसांच्या आत बिल मिळणे बंधनकारक आहे. मात्र, पाच महिने उलटूनही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाहीत. कारखान्याने पैसे न दिल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. कर्जाचे हप्ते, मुलांचे शिक्षण, दवाखाना आणि लग्नसराईच्या खर्चासाठी पैसे नसल्याने कुटुंब विवंचनेत आहे. नाईलाजास्तव आम्हाला हे टोकाचे पाऊल उचलावे लागले.


















