बेळगाव : उसाला योग्य दर मिळावा, या मागणीसाठी विविध शेतकरी संघटनांकडून आंदोलन सुरू असतानाच साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू करण्याच्या मुद्द्यावरून संघटनांमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत.एका बाजूला स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि राज्य शेतकरी संघटनेने केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हुबळी येथे आंदोलन करत १२ ऑक्टोबर रोजी दिल्लीत होणाऱ्या बैठकीनंतरच ऊस गाळप हंगाम सुरू करण्याची भूमिका घेतली आहे. तर दुसरीकडे राज्य रयत संघ आणि हरित सेनेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत साखर कारखानदारांची बैठक घेऊन उसाला प्रतिटन ६ हजार रुपये दर निश्चित करावा आणि त्यानंतर गाळप हंगाम सुरू करावा, अशी मागणी केली आहे.
दिल्लीतील बैठकीनंतरच गाळप सुरू करण्याची भूमिका
स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि राज्य शेतकरी संघटनेने २९ सप्टेंबर रोजी हुबळी येथे केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन केले होते. ऊसदराच्या प्रश्नाकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधल्यानंतर प्रल्हाद जोशी यांनी शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींना चर्चेसाठी १२ ऑक्टोबर रोजी दिल्ली येथे बैठकीसाठी आमंत्रित केले आहे.या पार्श्वभूमीवर ऊसदराचा प्रश्न चर्चेतून मार्गी लागेपर्यंत साखर कारखान्यांनी गाळप सुरू करू नये, अशी भूमिका संबंधित संघटनांनी घेतली आहे. काही ठिकाणी ऊसतोडणीसाठी आलेल्या टोळ्यांनाही रोखण्यात आल्याचे सांगण्यात आले.
६ हजार रुपये प्रतिटन दराची मागणी
दरम्यान, राज्य रयत संघ आणि हरित सेनेने जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना निवेदन दिले आहे. साखर कारखानदार आणि कारखाना मालकांची बैठक तातडीने बोलावून त्यामध्ये उसाला प्रतिटन ६ हजार रुपये दर निश्चित करावा, अशी मागणी या संघटनांनी केली आहे. दर निश्चित केल्यानंतर गाळप हंगाम सुरू करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.ऊसदराचा मुद्दा दोन्ही बाजूंच्या संघटनांसाठी समान असला, तरी गाळप हंगाम सुरू करण्याच्या वेळेबाबत वेगवेगळ्या भूमिका घेतल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे.त्यामुळे ऊसदरावर ठोस निर्णय घेऊन गाळप हंगामाबाबत स्पष्ट दिशा देण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. संघटनांच्या मागण्या ऊसदराच्या मुद्द्यावर केंद्रित असल्या, तरी गाळप सुरू करण्याबाबतच्या वेगवेगळ्या भूमिकांमुळे शेतकऱ्यांसमोर निर्णयाचा प्रश्न निर्माण झाला आहे.


















