नवी दिल्ली : देशातील एल निनो परिस्थितीचा काही प्रमाणात कृषी कर्जांवर परिणाम होऊ शकतो. मात्र, यामुळे बँकिंग क्षेत्रात मोठे आर्थिक संकट निर्माण होण्याची शक्यता नाही. तसेच आर्थिक वर्ष 2026-27 (FY27) मध्ये बँकांची कर्जवाढ आणि कर्जाची गुणवत्ता चांगली राहील, असा अंदाज येस सिक्युरिटीजच्या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. अहवालानुसार, आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये कर्जावरील संभाव्य तोट्याचा (क्रेडिट कॉस्ट) भार मागील वर्षाच्या तुलनेत लक्षणीय वाढणार नाही. तसेच आर्थिक वर्ष 2027-28 मध्ये एक्स्पेक्टेड क्रेडिट लॉस (ECL) नियम लागू झाल्यानंतरही बँकांवर कोणताही मोठा एकरकमी आर्थिक परिणाम होणार नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.
बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर कृषी कर्जांवर विशेष लक्ष ठेवण्याची गरज असल्याचे अहवालात म्हटले आहे. एल निनोमुळे काही कृषी कर्जांवर परिणाम होऊ शकतो. मात्र, यापूर्वीच्या अनुभवांनुसार हा परिणाम फार मोठा किंवा व्यापक स्वरूपाचा नसतो. तरीही सुपर एल निनोची शक्यता लक्षात घेऊन परिस्थितीवर बारकाईने नजर ठेवली जाणार आहे. अहवालात बँकिंग क्षेत्रासाठी तीन प्रमुख जोखमींचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामध्ये पश्चिम आशियातील संघर्ष, एल निनोचा प्रभाव आणि जागतिक व्यापार शुल्कांचा (टॅरिफ) उशिरा होणारा परिणाम यांचा समावेश आहे.
असुरक्षित (अनसिक्युअर्ड) कर्जांवरील वाढलेला ताण आता कमी होत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. मात्र, नाममात्र जीडीपी वाढीचा मंद वेग आणि एल निनोचा सूक्ष्म वित्त (मायक्रोफायनान्स) क्षेत्रावर होणारा संभाव्य परिणाम यामुळे या क्षेत्रात काही प्रमाणात दबाव कायम राहू शकतो. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) क्षेत्रातील कर्जांवरही लक्ष ठेवण्याची गरज असल्याचे अहवालात म्हटले आहे. पश्चिम आशियातील संघर्ष आणि व्यापारातील अडचणींचा या क्षेत्रावर परिणाम होऊ शकतो. मात्र, या क्षेत्रात मोठा आर्थिक ताण निर्माण होण्याची शक्यता नसल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. आवश्यक असल्यास इमर्जन्सी क्रेडिट लाईन गॅरंटी योजना (ECLGS) संरक्षणात्मक भूमिका बजावू शकते.
कर्जवाढीबाबत अहवालात म्हटले आहे की, कॉर्पोरेट कर्जांमधील वाढ तसेच एमएसएमई आणि किरकोळ (रिटेल) कर्जांची सातत्यपूर्ण मागणी यामुळे बँकांच्या एकूण कर्जवाढीचा वेग कायम राहील. सध्या कर्जवाढ सुमारे 17 टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. आर्थिक वर्षाच्या अखेरीस त्यात काहीशी मंदी येऊ शकते, मात्र ती 13 ते 16 टक्क्यांच्या दरम्यान कायम राहण्याचा अंदाज आहे. येस सिक्युरिटीजच्या अहवालानुसार, त्यांच्या अभ्यासातील बँकांची निव्वळ व्याज उत्पन्न (NII) वाढ आर्थिक वर्ष 2025-26 मधील 5.3 टक्क्यांवरून आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये 16.1 टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. त्यानंतर आर्थिक वर्ष 2027-28 मध्येही ती 16.1 टक्के, तर 2028-29 मध्ये 15.1 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.


















