कोल्हापूर : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति टन 5500 रुपये दर मिळावा, साखर उद्योगाच्या उत्पन्नात न्याय्य वाटा मिळावा आणि वजनकाटा, ऊसतोडणी-वाहतूक खर्च व एफआरपीच्या अंमलबजावणीत पारदर्शकता यावी, यासाठी महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने साखर सहसंचालकांना राज्य सचिव गिरीश फोंडे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले.
यावेळी गिरीश फोंडे म्हणाले, केंद्र सरकारने २०२६–२७ हंगामासाठी १०.२५ टक्के साखर उताऱ्यावर प्रतिटन ३,६५० रुपये एफआरपी जाहीर केली आहे. मात्र, खत, बियाणे, औषधे, मजुरी, सिंचन, जमीन व भांडवलाचा खर्च आणि शेतकरी कुटुंबाचे श्रम विचारात घेता हा दर अपुरा आहे. सरकारने 5500 रुपये प्रति टन दर देऊन योग्य तोडगा काढावा. रंगराजन समितीच्या शिफारशीनुसार रेवेन्यू शेरिंग तत्त्वानुसार उपपदार्थां उत्पन्नातील सरसकट न्याय हिस्सा शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे.
यावेळी प्रादेशिक सहसंचालक म्हणाल्या, सध्याच्या ऊसदराच्या कोंडीवर तोडगा काढण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. 28- 29 ऑक्टोबर तारखेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात साखर कारखाने व्यवस्थापन व शेतकरी संघटनांची संयुक्त मीटिंग बोलवून तोडगा काढू. यावेळी किसान सभेचे जिल्हा सचिव नामदेव पाटील, कृष्णात पाटील, बाबुराव गावडे, राजेंद्र खटाळे, युवराज देसाई, ज्योतीराम घोडके, भगवान पाटील, अरविंद कुरणे, मारुती नलवडे यांच्यासहित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
किसान सभेने स्पष्ट केले की, ऊस दराचा प्रश्न हा केवळ साखर कारखान्यांच्या नफ्याचा नसून शेतकऱ्यांच्या जगण्याचा, शेतीच्या टिकावाचा आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा प्रश्न आहे. सरकार व साखर प्रशासनाने या मागण्यांवर तातडीने कार्यवाही करून ऊस उत्पादकांना न्याय द्यावा. शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास व्यापक शेतकरी संघर्ष उभारण्यात येईल, असा इशाराही किसान सभेने दिला.


















